हवामान विभागाचे अंदाज खरंच इतके कसे चुकतायत..? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 06:00 PM2018-10-15T18:00:13+5:302018-10-16T15:24:56+5:30

हवामान खात्याचे अंदाज जर वारंवार चुकू लागले तर आर्थिक परिस्थितीने आधीच कंबरडे मोडलेला शेतकरी हवालदिल होईलच पण तसेच तो संतप्त देखील होईल..या उद्भवलेल्या निर्णायक परिस्थितीवर लोकमतच्या पुणे आवृत्तीतील विवेक भुसे यांचा नेमके भाष्य करणारा हा लेख..

How is the weather department's estimates so false ? | हवामान विभागाचे अंदाज खरंच इतके कसे चुकतायत..? 

हवामान विभागाचे अंदाज खरंच इतके कसे चुकतायत..? 

Next
ठळक मुद्देमान्सूनच्या अंदाजाच्या मॉडेलचा नव्याने विचार करायची गरज पेरणीच्या अंदाजातली चूक फार धोक्याची आणि दूरगामी वाईट परिणाम आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल हा अंदाज सपशेल चुकीचाअंदाज चुकला, लोकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले तरी त्याला कोणीही जबाबदार नसतो़.हवामान विभागाने देशात ३६ हवामान विभाग

- विवेक भुसे 
पुणे : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी पुणे वेधशाळेच्या (सिमला आॅफिस) दरवाजाला टाळे ठोकून आपली नाराजी व्यक्त केली़. ही केवळ प्रातिनिधिक प्रतिक्रिया प्रत्यक्ष हवामान विभागाच्या दारात जावून काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे़. हवामान विभागाविषयी देशभरात जवळपास अशीच संतप्त भावना शेतकरी आणि सामान्यांची झाली आहे़. हवामान विभागाचे अंदाज चुकल्याने सामान्य शेतकरी, व्यावसायिक व इतर नागरिकांचे जे कोट्यवधींचे नुकसान होते. त्याची जबाबदारी आता कोणीतरी घेतली पाहिजे़. या दृष्टीने आता तरी हवामान विभागाने हस्तीदंती मनोऱ्यातून बाहेर येऊन प्रत्यक्ष लोकांना उपयोग पडेल व ज्याचा प्रत्यक्ष फायदा होऊन अशा गोष्टी करण्याची गरज निर्माण झाली आहे़. त्यासाठी मान्सूनच्या अंदाजासाठी जे अमेरिकेचे मॉडेल वापरले जाते, त्याचाही नव्याने फेरविचार करण्याची आवश्यकता आहे़ .
भारतीय हवामान विभागाने मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज यंदा तब्बल ६ टक्क्यांनी चुकला आहे़ .याशिवाय विभागीय अंदाजात मोठी तफावत दिसून आली आहे़. भारतीय हवामान विभाग हा दीर्घकालीन अंदाज व्यक्त करतात़. त्यानंतर जुलै व आॅगस्टमधील पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो़. अल्पकालीन अंदाज काही प्रमाणात बरोबर येतात़. पण त्यालाही मर्यादा आहेत़. हवामान विभागाकडून जे काही अंदाज व्यक्त केले जातात़.. ते इतक्या विस्तृत प्रदेशासाठी असतात की, त्यापैकी कोठेही थोडा जरी पाऊस पडला तरी आम्ही म्हटल्याप्रमाणे पाऊस झाला असे मानून ते आपली पाठ थोपटून घेत असतात़. ‘कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता’ अशा प्रकारच्या अंदाजाचा शेतकऱ्याना काडीचा ही उपयोग होत नाही़. याशिवाय हवामान विभागाने देशाचे ३६ हवामान विभाग केले आहेत़. त्यात महाराष्ट्रात कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे चार हवामान विभाग आहेत़. या विभागाची सरासरी काढून आपला अंदाज बरोबर असल्याचे आजपर्यंत हवामान विभागाने जाहीर करत आले आहे़ पण, यापुढे ते आता चालणार नाही़. 
भारतीय हवामान विभागाकडून मान्सूनच्या अंदाजासाठी अमेरिकेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो़. त्यात भारतीय हवामानानुसार आवश्यक त्या सुधारणा करुन त्याद्वारे सध्या दीर्घकालीन अंदाज व्यक्त करण्यात येतात़. यंदाच्या हवामान विभागाने मे अखेर जो दीर्घकालीन अंदाज व्यक्त केला होता, तो साफ चुकीचा ठरला आहे़. पावसाचे प्रमाण कमी असणार हे आॅगस्टमध्ये लक्षात आल्यानंतर स्कायमेट सारख्या खासगी संस्थेने आपल्या अंदाजात सुधारणा केली व सर्वांना अर्लट केले होते़. पण, त्याचवेळी भारतीय हवामान विभागाने आपल्या अंदाजात सुधारणा करीत आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडले असा अंदाज व्यक्त केला होता़. तो सपशेल चुकीचा ठरला आहे़. 
त्याचबरोबर हवामान विभागामार्फत जो निष्कर्ष काढला जातो, त्यातही आता बदल करण्याची आवश्यकता वाटू लागली आहे़. अंदाज आणि वास्तव यांचा ताळमेळ घालणे आवश्यक असते. तसेच केवळ मान्सूनने सरासरी गाठली म्हणजे तो देशासाठी, शेतीसाठी आणि पयार्याने सर्वसामान्यांसाठी उपकारक ठरतो, असे नाही. त्याचे आगमन, वितरण या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये बदल झाल्यास शेतकऱ्यांचे अर्थगणित कोलमडते. पेरणीच्या अंदाजातली चूक एकूण भारतीय शेतकऱ्यांचा विचार करता, फार धोक्याची आणि दूरगामी वाईट परिणाम करणारी ठरू शकते. शेतकऱ्यांच्या शेतीवर आणि पेरणीसाठी आणि शेत मशागतीसाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च यामुळे वाया जाऊ शकतो. त्याचा आता गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे़. 
सध्या मान्सूनच्या पावसाचा अंदाज व्यक्त करता ज्या घटकाचा विचार केला जातो, त्याशिवाय आणखी काही घटकांचा मान्सूनवर परिणाम होतो का, याचाही नव्याने विचार करण्याची गरज आहे़. 
मान्सूनचे अभ्यासक आणि भौतिकशास्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी १२ वर्षे केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष मान्सूनच्या कितीतरी आधी मार्च २०१८ मध्ये आयएमडी तसेच पंतप्रधान कार्यालयाला पाठविले होते़.  त्यांच्या संशोधनानुसार सौर डागांचा मान्सूनवर परिणाम होत असतो़. २००९ आणि १९८६ सारखी परिस्थिती सध्या सोलर सर्कल २४ सुरु आहे़. त्यामुळे यंदा मान्सूनच्या पावसावर परिणाम होणार आहे़. मान्सूनच्या अंदाजासाठी हवामान विभाग वापरत असलेल्या मॉडेलमध्ये  सोलर सर्कलचा विचार करण्यात आलेला नाही, असे त्यांनी आयएमडी व पंतप्रधान कार्यालयाला कळविले होते़. त्याची शास्त्रीय कारणे व सध्या असलेली परिस्थिती या बाबींही त्यांनी ठळकपणे मांडल्या होत्या़. पंतप्रधान कार्यालयाने त्याबाबत आयएमडीला त्यांचे मत विचारले होते़. पण त्यांच्याकडे कोणतीही अधिक चौकशी न करता अशी कोणतीही शक्यता नसल्याचे आयएमडीने पंतप्रधान कार्यालयाला कळवून टाकले होते़. पण आज देशातील परिस्थिती त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजप्रमाणे दिसून येत आहे़. एकेकाळी आयआयटीएम मध्ये कार्यरत असलेले किरणकुमार यांनी व्यक्त केलेल्या अंदाजावर आयएमडीने विचार करण्याची आवश्यकता आहे़. त्याचबरोबर देशातील प्रत्येक तालुक्यानिहाय व क्षेत्रनिहाय अल्पकालीन अंदाज दिला जाणार असल्याचे हवामान विभागाकडून जाहीर केले जाते़ ते लवकरात लवकर सुरु करण्याची गरज आहे़. कारण, शेतकऱ्यांना आपल्या शिवारात गावात, परिसरात केव्हा व किती पाऊस पडेल, याची माहिती मिळाली. तरच त्याचा त्यांना उपयोग होईल़ हवामान विभागाने त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे़. आज हवामान विभागाचा अंदाज चुकला लोकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले तरी त्याला कोणीही जबाबदार नसतो़. हवामान विभागाने आता ही जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे़. 

Web Title: How is the weather department's estimates so false ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.