‘पद्मावत’ला संरक्षण देणार : गृहराज्यमंत्री दिलीप केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 03:13 AM2018-01-24T03:13:52+5:302018-01-24T03:14:08+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून ‘पद्मावत’ सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान चित्रपटगृहांना संरक्षण देणे, ही राज्य शासनाची जबाबदारी आहे, असे सांगत हा चित्रपट राज्यात प्रदर्शित होणार असल्याचे गृहराज्यमंत्री दिलीप केसरकर यांची मंगळवारी स्पष्ट केले.

 Home Minister Dilip Kesarkar will provide protection for Padmavat | ‘पद्मावत’ला संरक्षण देणार : गृहराज्यमंत्री दिलीप केसरकर

‘पद्मावत’ला संरक्षण देणार : गृहराज्यमंत्री दिलीप केसरकर

Next

विशेष प्रतिनिधी 
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून ‘पद्मावत’ सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान चित्रपटगृहांना संरक्षण देणे, ही राज्य शासनाची जबाबदारी आहे, असे सांगत हा चित्रपट राज्यात प्रदर्शित होणार असल्याचे गृहराज्यमंत्री दिलीप केसरकर यांची मंगळवारी स्पष्ट केले.
सरकारने चित्रपटगृह मालक आणि त्यांच्या संघटनांशी चर्चा केली असून चित्रपट शांततेत प्रदर्शित व्हावा, यासाठी सरकार लक्ष घालेल, असे सांगितले आहे. आता चित्रपट प्रदर्शित करायचा की नाही, याचा निर्णय चित्रपटगृह मालकांना घ्यायचा आहे. तसेच प्रदर्शनादरम्यान, पुरेसा पोलीस बंदोबस्त असेल, असेही असे केसरकर यांनी सांगितले.
पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पद्मावतच्या प्रदर्शनास विरोध दर्शवित हा चित्रपट प्रेक्षकांनी बघू नये, कारण त्यात इतिहासाचा विपर्यास केला आहे व राणी पद्मावतीची चुकीची- वाईट प्रतिमा उभी केली आहे, असे म्हटले आहे. केसरकर याबाबत म्हणाले की, रावल स्वत: राजपूत समाजाचे आहेत. त्यांनी व्यक्त केलेले मत वैयक्तिक आहे. सरकार म्हणून चित्रपटाच्या प्रदर्शनास आम्हाला संरक्षण द्यावेच लागेल. नागरिकांनी संयम बाळगावा.
निर्माते करबुडवे
संजय लीला भन्साळी प्रोडक्शन्सच्यावतीने पन्हाळा परिसरात मसाई पठारावर पद्मावतचे चित्रीकरण मार्च २०१७ मध्ये करण्यात आले होते़ याप्रकरणी कोल्हापूर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व वनविभाग यांच्याकडून घेतलेली परवानगीची अटही पाळलेली नाही, तसेच २० दिवसांच्या चित्रीकरणाचे एक लाख ९१ हजार रुपये वैध शुल्क न भरता केवळ तीन दिवसांचे २८ हजार रुपये शुल्क भरले आहे़ याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने मंगळवारी नंदुरबारमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली़
मनसेचा पाठिंबा
सेन्सॉर बोर्डाची परवानगी आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाला होणारा विरोध चुकीचा आहे. करणी सेनेने चित्रपटाच्या विरोधात घेतलेली भूमिका चुकीची आहे. आवश्यकता भासल्यास मुंबईसह महाराष्ट्रात ‘पद्मावत’च्या प्रदर्शनासाठी मनसे सज्ज असल्याचा इशारा मनसे सरचिटणीस आणि चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी मंगळवारी दिला.
बंदीसाठी जलआंदोलन
‘पद्मावत’ चित्रपटावर देशभरात बंदी घालावी, या मागणीसाठी शिंदखेडा (जि. धुळे) तालुक्यातील जुने कोळदे येथे हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारपासून जलआंदोलन सुरू केले आहे. लेखी हमी प्रशासनाने दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. तापी नदीपात्रात सुरू झालेल्या जलआंदोलनात राजपूत समाजासह दोंडाईचा परिसरातील हिंदु संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला आहे.

Web Title:  Home Minister Dilip Kesarkar will provide protection for Padmavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.