- गणेश वासनिक । लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून रिक्त आणि वाढीव जागांचा प्रस्ताव त्यांनी मागविला आहे. त्यामुळे येत्या काळात वनरक्षक, वनपाल आणि वनक्षेत्रपालांच्या पदांची भरती केली जाईल, असे संकेत मिळाले आहेत.
वनक्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाकडे तोकडे मनुष्यबळ आहे. त्यामुळे जंगलांवर वाढते अतिक्रमण, वन्यजीवांचे संरक्षण, वृक्षारोपण, संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचे कामकाज, गावांचा विकास, रेस्क्यू आॅपरेशन चमू, व्याघ्र प्रकल्पांचा वाढता विस्तार, गावांचे पुनर्वसन असे विविध उपक्रम राबविताना वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वनविभागातर्फे वाढीव जागांचा प्रस्ताव सामान्य प्रशासन
विभागाकडे पाठविण्यात आला आहे. सुधीर मुनगंटीवारांकडे वनांसह अर्थखातेही असल्याने या वाढीव जागांना मंजुरी मिळण्याचे संकेत आहेत.

जंगलांवरील वाढते अतिक्रमण रोखणे, वन्यजीवांचे संरक्षण, वृक्षाच्छादन आदी महत्त्वाची कामे करताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे वनाधिकाऱ्यांवर ताण वाढतो आहे. त्यामुळे वाढीव जागांच्या मागणीसंदर्भात सुधारित प्रस्ताव मागविण्यात आला आहे. पदभरतीबाबत त्वरेने निर्णय घेतला जाईल.
- सुधीर मुनगंटीवार, अर्थ व वनमंत्री, महाराष्ट्र