The government will pay half the rates of Maratha and Kunabi students | मराठा, कुणबी विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क सरकार भरणार   

मुंबई  - मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना तब्बल ६०५ शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी लागणारी निम्मे शुल्क राज्य सरकार भरणार असून, यासंदर्भातील शासन निर्णयातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना मंगळवारी झालेल्या मराठा समाजाच्या मागण्यांवर नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतला.
उपसमितीची बैठक मंगळवारी समितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री विजय देशमुख, कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मराठा समाजातील समस्यांचा अभ्यास करून योग्य उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापण्यात आलेल्या ‘सारथी’ संस्थेची रचना व कार्यपद्धती ठरविण्यासाठी नेमलेल्या डॉ. सदानंद मोरे यांच्या समितीला संस्थेचे कामकाज सुरू होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत घोषित केलेल्या नव्या योजनांची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करावे, तसेच आर्थिक मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीची उत्पन्न मयार्दा आठ लाखापर्यंत करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या.