लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कथित गोरक्षकांकडून सध्या बीफ बाळगत असल्याच्या संशयावरुन गोरगरीब लोकांवर तसेच अल्पसंख्याक व दलित समाजातील व्यक्तींवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असून याप्रकारांनी देशातील सामाजिक वातावरण दुषित होत आहे. त्यामुळे सरकारने कोणकोणत्या प्राण्यांचे मांस बीफ या प्रकारात मोडते याची नेमकी व्याख्या निश्चित करुन लोकांमध्ये जागृती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.
मलिक म्हणाले , गुजरात, हरियाणा, झारखंडच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रातही गोमांसाच्या संशयावरुन होणाऱ्या मारहाणीचे लोण पोहचले आहे. काटोल तालुक्यातील बारशिंगी गावात ईस्माईल नावाच्या व्यक्तीला बीफ बाळगल्याच्या संशयावरुन मारहाण झाली. याची मुख्यमंत्र्यानी गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
सरकारने नेमकी बीफची परिभाषा निश्चित करावी, कारण बीफ या प्रकारात गायी, बैल सोबतच रेडा आणि म्हैशीच्या मांसाचा समावेश होतो. आपल्याकडे रेडा आणि म्हैशीचे मांस बाळगणे हे कायदेशीर आहे. याबाबत सरकारने जनजागृती करण्याची गरज असून गोरक्षणाच्या नावाखाली मारहाण करणाऱ्यांना आवर घालण्याची गरज असल्याचे मत मलिक यांनी व्यक्त केले.