अजब सरकारचे गजब फर्मान; म्हणे, गारपिटीत मृत झालेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 04:12 PM2018-02-15T16:12:33+5:302018-02-15T16:23:54+5:30

गारपिटीमुळे मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा, असे फर्मान जालना जिल्ह्यातील तलाठ्याने काढल्याची धक्कादायक बाब गुरुवारी ....

Government Say, do hen's post mortem! | अजब सरकारचे गजब फर्मान; म्हणे, गारपिटीत मृत झालेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा!

अजब सरकारचे गजब फर्मान; म्हणे, गारपिटीत मृत झालेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा!

Next

जालना - गारपिटीमुळे मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा, असे फर्मान जालना जिल्ह्यातील तलाठ्याने काढल्याची धक्कादायक बाब गुरुवारी काँग्रेस नेत्यांच्या पाहणी दरम्यान उघडकीस आली. यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवला असून, हा पीडितांना मदतीपासून वंचित ठेवू पाहण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही केला आहे. 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती आ. माणिकराव ठाकरे आदी नेत्यांनी आज वंजार उम्रज, थार, जामवाडी आदी गारपीटग्रस्त गावांची पाहणी केली. त्यावेळी ही धक्कादायक बाब समोर आली. पाहणीनंतर काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. मोठ्या जनावरांचे शवविच्छेदन करणे समजू शकतो. पण एवढ्या मोठ्या नैसर्गिक संकटात मेलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करणे अव्यवहार्य असून,ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असल्याचे खा. चव्हाण  जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर म्हणाले. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकारातून अजब सरकारच्या गजब प्रशासनाचा कोडगेपणा दिसून आल्याचे सांगितले. 
खा. अशोक चव्हाण यांनी गारांचा मार लागलेल्या एका बागेतील द्राक्षाचे घोसच जिल्हाधिकाऱ्यांना दाखवले. गारपीट, वादळ व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली असली तरी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. प्रशासनाने पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, अशी मागणी त्यांनी केली. 
गारपिटीमुळे फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. शेतकर्‍यांना तातडीने व भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला सळो की पळो करून सोडणार, असा इशारा विखे पाटील यांनी दिला. 
जालना जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी करताना या शिष्टमंडळाने शेती व फळबागांना भेटी दिल्या. तलाठ्यांनी पंचनामेच न केल्यामुळे गावा-गावांत गारपिटीमुळे मृत्युमुखी पडलेली जनावरे अजून तशीच पडून असल्याचे या पाहणी दौर्‍यात दिसून आले. 
गारपिटीमुळे मृत्युमुखी पडलेले वंजार उम्रज येथील रहिवासी नामदेव शिंदे यांच्या कुटुंबियांचीही काँग्रेस शिष्टमंडळाने सांत्वनपर भेट घेतली. सामाजिक जबाबदारी म्हणून या कुटुंबाला १ लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने यावेळी जाहीर केला. या दौऱ्यामध्ये माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Government Say, do hen's post mortem!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.