निवडणूक वर्षात सरकारला आठवले ‘गांधीमहात्म्य’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:45 AM2018-08-20T00:45:23+5:302018-08-20T06:42:23+5:30

वर्षभर भरगच्च कार्यक्रम; गांधीविचारांचा प्रचार आणि प्रसार करणार

Government remembers the 'Gandhi Mahatmya' in the election year! | निवडणूक वर्षात सरकारला आठवले ‘गांधीमहात्म्य’!

निवडणूक वर्षात सरकारला आठवले ‘गांधीमहात्म्य’!

Next

- यदु जोशी

मुंबई : काही महिन्यांत येऊ घातलेली लोकसभा निवडणूक आणि सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपाप्रणित देवेंद्र फडणवीस सरकारला राष्ट्रीय पिता महात्मा गांधी यांची आठवण झाली आहे. गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत ‘गांधी महात्म्या’ची पारायणं करण्याचा ‘भरगच्च कार्यक्रम’ सरकारने आखला आहे.
गांधीविचार आणि सर्वोदयींना राष्ट्रीय स्वंयसेवक संघ परिवाराने ‘आपलं’ मानलंच नाही, आजवर कधीच संघशाखेत गांधी जयंती साजरी झाली नाही, असे आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर होत आले आहेत. गांधीहत्येचं पातकही संघाच्या माथी मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र, केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ‘स्वच्छता अभियाना’च्या माध्यमातून गांधींना आपलंस करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिका, चीन आणि जपानच्या राष्टÑप्रमुखांना साबरमती आश्रमाची भेट घडवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेशी पाहुण्यांना सूतकताईचे महत्व पटवून दिले.
येत्या २आॅक्टोबर रोजी गाधींजींची १५० वी जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधून २ आॅक्टोबरपासून केंद्र आणि राज्य सरकार वर्षभर भरगच्च कार्यक्रम आणि उपक्रम राबविणार आहे. केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदस्य आहेत. राज्य सरकारने देखील वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोजन समिती स्थापन केली
जाणार असून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे समितीच्या सहअध्यक्ष असतील. ही समिती कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करेल. त्यांची अंमलबजावणी आणि देखरेख यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती असेल.
येत्या २ आॅक्टोबरपासून राज्यात ठिकठिकाणी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यांच्या अवतीभोवती सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. सेवाग्राम विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. विविध शहरे, गावांमध्ये असलेल्या महात्मा गांधी मार्गांवर ग्रामोद्योगातून स्वयंरोजगार या विषयांवर आठवड्यातून दोन दिवस प्रदर्शने भरविण्यात येतील.

राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन, विपणन व व्यवसाय विकास, खादीचे महत्त्व या विषयांवर परिसंवाद होतील. खादी आणि ग्रामोद्योगातील वस्तूंच्या विक्रीसाठी विभागीय पातळीवर महाखादी प्रोत्साहन व विक्री डेपो उभारण्यात येतील. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सौरऊर्जा चरख्यांचे वाटप केले जाईल. त्यासाठी सरकारने आठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

असे असतील ‘सर्वोदयी’ उपक्रम
‘एक विद्यार्थी, एक शिक्षक’
या योजनेंतर्गत एक शिक्षक अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यास दत्तक घेतील. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांधीजींचे कार्य आणि त्यांचे विचार या बाबत मार्गदर्शन केले जाईल.
गांधीजींचे वास्तव्य राहिलेले मुंबईतील मणिभवन, आगा खान पॅलेस आणि पुण्यातील येरवडा कारागृहात विशेष सुविधा पुरविण्यात येतील.
‘गांधी फॉर टुमारो’ अंतर्गत महात्मा गांधी मानव संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल.
‘महात्मा गांधी १५०’ असे मोबाइल अ‍ॅप तयार करून त्याच्या माध्यमातून गांधीविचारांचा प्रसार करण्यात येणार आहे.
150 व्या जयंतीनिमित्त येत्या २ आॅक्टोबरपासून राज्यात ठिकठिकाणी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यांच्या अवतीभोवती सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

Web Title: Government remembers the 'Gandhi Mahatmya' in the election year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.