सुधीर लंके,

अहमदनगर- मोहटादेवी देवस्थानने ब्रह्मांडातील ऊर्जा मिळविण्याच्या नावाखाली २० किलो सोने मंदिरात पुरलेच. त्याचबरोबर आहे त्या सोने-चांदीचाही हिशेब खुद्द विश्वस्तांनाही मिळायला तयार नाही. सोन्याची बँकेत गुंतवणूक करण्याबाबत ठराव होतात. पण, प्रत्यक्षात या सोन्याची गुंतवणूक होते का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. उपरोक्त २० किलो सोन्याचा हिशेब एका विश्वस्तांनी मागितला आहे.
मोहटादेवीला भाविक मोठ्या प्रमाणावर सोने-चांदी अर्पण करतात. १ मार्च २०१५ रोजी झालेल्या देवस्थानच्या विश्वस्त मंडळ बैठकीत सुवर्ण गुंतवणूक योजनेत बँकेत ठेवलेल्या १५ किलो १९४ ग्रॅम सोन्याची पुनर्गुंतवणूक (गोल्ड बॉन्ड) तसेच, देवस्थानकडील २० किलो ४३२ ग्रॅम शुद्ध सोन्याची बँकेत गुंतवणूक करणे, असे दोन स्वतंत्र विषय होते. बैठकीतील ठरावाप्रमाणे ७ एप्रिल २०१५ रोजी १५ किलो सोन्याची पुनर्गुंतवणूक झाली. त्याचे प्रमाणपत्रही उपलब्ध आहे. मात्र, २० किलोचे शुद्ध सोने बँकेत गुंतवले गेले की नाही? याबाबत काहीही तपशील मिळत नाही. संस्थानचे तत्कालीन विश्वस्त नामदेव गरड यांनी या सोन्याच्या गुंतवणुकीचे प्रमाणपत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वारंवार मागितले. मात्र, त्यांना ते आजवर मिळालेले नाही. शुद्धच असलेल्या या सोन्याचे संस्थानने यावर्षी १२ एप्रिलला टाकसाळ विभागाकडून पुन्हा प्रमाणीकरण करुन घेतले. मात्र, त्यानंतरही या सोन्याचे गुंतवणुकीचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे या सोन्याचा गतवर्षीच्या १ मार्चपासून नक्की प्रवास कसा झाला?, याबाबत संशयकल्लोळ आहे.
संस्थानकडे ३१ किलो ९७९ ग्रॅम अशुद्ध सोने व ८११ किलो अशुद्ध चांदी असून ती सप्टेंबर २०१५ मध्ये शुद्धीकरणासाठी टाकसाळ विभागाकडे पाठवल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावर्षी विश्वस्त गरड यांना दिली. हे अशुद्ध सोने-चांदी टाकसाळ विभागाकडे पाठविण्याचा विषय विश्वस्त मंडळाच्या कुठल्याही बैठकीत न येता ही कार्यवाही कशी झाली?, असा प्रश्न गरड यांनी उपस्थित केला आहे. शुद्ध सोने बँकेत न गुंतवता ते हातावर ठेवले जाते. तसेच शुद्ध सोनेच अशुद्ध दाखवून त्याच्यात जाणीवपूर्वक घट दाखवली जात असल्याचा संशय या सर्व व्यवहाराला येत आहे.
संस्थानने यावर्षी २९ किलो २२८ ग्रॅम सोन्याची बँकेत गुंतवणूक केली. टाकसाळात पाठविलेले ३१ किलो ९७९ ग्रॅम सोने शुद्ध होऊन आल्यानंतरच ही गुंतवणूक झाली, असे दिसते. तसे असेल तर शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत संस्थानचे तब्बल २ किलो ७५१ ग्रॅम सोने घटले आहे.
>सोन्याचे प्रमाणपत्र कर्मचाऱ्याच्या ताब्यात
सोने व चांदीत काहीही अनियमिता नाही. सर्व सोने-चांदी वेळेवरच बँकेत गुंतवली जाते, असे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. मात्र, संस्थानच्या १५ किलो १९४ ग्रॅम सोन्याच्या गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही एक वर्ष हे सोने तसेच पडून होते. गुंतवणुकीचे प्रमाणपत्र संस्थानचा कर्मचारी पी. एस. रुढी याच्या ताब्यात असल्याने संस्थानला सोन्याची पुनर्गुंतवणूक करण्यास एक वर्ष विलंब लागल्याचे कागदोपत्री दिसत आहे.
>अंनिसची चौकशीची मागणी
न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील संस्थानमधील प्रकार गंभीर आहेत. सरकारने देवस्थानची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे.
>‘सीईओ’, ‘लेखापाल’ हाताळतात सोने-चांदी
बँकेतील ‘लॉकर’ तसेच सोने-चांदीचे व्यवहार हाताळण्याचे अधिकार संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी व लेखापाल यांचेकडे होते. विश्वस्तांनी हरकत घेतल्यानंतर नोव्हेंबर २०१५ पासून हे अधिकार अध्यक्ष किंवा पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याचे ठरले. आर्थिक व्यवहार मात्र अध्यक्ष व ‘सीईओ’ हे दोघेच हाताळत आहेत. संस्थानच्या घटनेत दोन विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बँकेतील आर्थिक व्यवहार पाहावेत, असे म्हटले आहे. प्रत्यक्षात विश्वस्त मंडळात घटनाबाह्य ठराव केला गेला.
>तातडीने चौकशी
करा - कोळसे पाटील
मंदिरात सोने पुरणे ही अंधश्रद्धा आहे. हा गुन्हाच असून राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय आहे. याची तातडीने चौकशी व्हावी, अशी प्रतिक्रिया निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केली.