काळ्याबाजारावर टाच आल्याने योजनाच बंद पाडण्याचा डाव - गिरीश बापट

By अतुल कुलकर्णी | Published: April 21, 2018 01:03 AM2018-04-21T01:03:19+5:302018-04-21T01:03:44+5:30

रेशन दुकानातील ई-पॉस मशीनमुळे १० लाखांहून अधिक शिधापत्रिका बोगस आढळून आल्या, तर रेशन दुकानदारांनी ३८ हजार मे. टन धान्य कमी उचलले. या यंत्रणेमुळे रेशन दुकानातील धान्यांच्या काळ्याबाजारावर टाच आणल्यामुळे धाबे दणाणलेल्या दुकानदारांनी ही यंत्रणाच मोडून काढण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.

Girish Bapat will be launching a plan to block the black market | काळ्याबाजारावर टाच आल्याने योजनाच बंद पाडण्याचा डाव - गिरीश बापट

काळ्याबाजारावर टाच आल्याने योजनाच बंद पाडण्याचा डाव - गिरीश बापट

Next

मुंबई : रेशन दुकानातील ई-पॉस मशीनमुळे १० लाखांहून अधिक शिधापत्रिका बोगस आढळून आल्या, तर रेशन दुकानदारांनी ३८ हजार मे. टन धान्य कमी उचलले. या यंत्रणेमुळे रेशन दुकानातील धान्यांच्या काळ्याबाजारावर टाच आणल्यामुळे धाबे दणाणलेल्या दुकानदारांनी ही यंत्रणाच मोडून काढण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.
नव्या यंत्रणेमुळे गोरगरिबांच्या घरात जाणारे धान्य काळ्या बाजारात विकता येईना म्हणून रेशन दुकानदारांनी राजकीय पक्षांना हाताशी धरून आंदोलन सुरू केले आहे. जे लोक ई-पॉस मशीन परत करतील त्यांच्या दुकानाचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नुकताच मुंबई, ठाण्यातील काही रेशन दुकानदारांनी मोर्चा काढून ई-पॉस मशीन परत केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात
एकही मशीन परत आलेले नाही, असे सांगून बापट म्हणाले, सर्वाेच्च न्यायालयाने स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी ‘आधार’चा आधार घेण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्याने नोटिफिकेशनही काढले आहे. तरीही जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवली जात असल्याचे बापट म्हणाले.
अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या ७ कोटी लाभार्थ्यांपैकी ८७ टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडींग करण्यात आले आहे. तर १०० टक्के शिधापत्रिकांचे डिजिटायझेशन झाले आहे. राज्यात एकूण ५२,३८१ रास्तभाव दुकानांमध्ये मायक्रो एटीएम दर्जाच्या पॉस मशीन बसविण्यात आल्या आहेत. त्यातून बायोमेट्रिक ओळख पटवून धान्याचे वितरण सुरू झाले. मात्र ही व्यवस्था कार्यान्वित होईपर्यंत ही यंत्रणा आपल्या गैरकारभाराच्या मुळावर येणार आहे याची जाणीव दुकानदारांना झाली नव्हती. त्यामुळे जानेवारीत ४३ टक्के तर फेब्रुवारीत ६१ टक्के व्यवहार या यंत्रणेमार्फत झाले.
जालना, वाशिम, भंडारा, वर्धा, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, अकोला, सांगली, अहमदनगर, परभणी, नागपूर, लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद येथे १०० टक्के धान्य वाटप आधारला लिंक करून झाले. त्यामुळे आपल्याला आता बोगस धान्य विकता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर याविरुद्ध दुकानदारांचे आंदोलन सुरू झाले आहे, असे बापट म्हणाले.

Web Title: Girish Bapat will be launching a plan to block the black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.