ऑनलाइन लोकमत
गोरेगाव, दि.03 - विहिरीमध्ये पडलेले घरगुती साहित्य व दुचाकी बाहेर काढताना दुचाकीतील पेट्रोल सांडल्याने विहिरीत निर्माण झालेल्या दूषित गॅसमुळे गुदमरून एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर एका पोलिस कॉन्स्टेबलसह तीन जणांना वायूबाधा झाल्याची घटना ३ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास हाताळा येथे घडली.
सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे २९ आक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पैशाच्या वादावरून दोन गटांत हाणामारी झाली होती. दरम्यान, एका गटातील शेख मुक्तार शेख सत्तार रा. हाताळा यांच्या घरातील सामानाची जाळपोळ करून काही सामानासह पिठाची गिरणी व एक दुचाकी विहिरीमध्ये टाकून दिली होती. सदर प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात १७ आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. 
गोरेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार सपोनि रवींद्र सोनवणे, पी.एस. आय. चिल्लांगे, ए.एस.आय. भुमीराज कुमरेकर, पोकॉ सुभाष जैताडे आदी पोलिस कर्मचारी ३ आॅक्टोबर रोजी सदर विहिरीत पडलेले साहित्य काढण्यासाठी हाताळा येथे गेले होते. तेव्हा पोकॉ सुभाष जैताडे यांनी दोरखंडाच्या सहाय्याने विहिरीमध्ये उतरून सामान काढण्यास सुरूवात केली. विहिरीमधून लोखंडी पेट्या, कोठ्या, पिठाची गिरणी आदी साहित्य बाहेर काढल्यानंतर जैताडे यांनी विहिरीमधील दुचाकीला दोरखंड बांधला. ती काढण्यासाठी कर्मचा-यांच्या हाती देत दोर ओढण्यास सांगितले. त्यावेळी दुचाकी उलटी लटकल्याने  पेट्रोल विहिरीत सांडले. विहिरीमध्ये त्याचा गॅस निर्माण झाला. यामुळे विहिरीमध्ये असलेल्या सुभाष जैताडे यांचा श्वास गुदमरल्याने ते पाण्यात पडून तडफडत होते. हे पाहून आणखी तिघे आत उतरले. त्यांनी जैताडेंना दोरखंड बांधून काठावरील ग्रामस्थांना वर ओढण्यास सांगितले; परंतु त्यांना वाचविण्यात हे तिघेही वायूबाधेने गुदमरून जात होते.मात्र दोरखंड हाती लागल्याने शेख मुक्तार शेख सत्तार आणि शेख फिरोज शेख गफार यांना विहिरीबाहेर निघता आले; परंतु संजय परसराम राऊत (२७, रा. कडोळी) यांचा श्वास गुदमरल्याने विहिरीतच मृत्यू झाला. बाधित पोकॉ सुभाष जैताडे व शेख मुक्तार, शेख फिरोज या तिघांना उपचारासाठी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी भोरे यांनी माहिती मिळताच घटनास्थळी भेट देत पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत गोरेगाव पोलिस ठाण्याला नोंद नसल्याची माहिती पोलिस कर्मचारी फोले यांनी दिली.