चौथ्या टप्प्यात भाजप, सेनेच्या बालेकिल्ल्यात चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 03:51 AM2019-04-26T03:51:46+5:302019-04-26T03:55:57+5:30

सर्वांत मोठा टप्पा : १७ मतदारसंघ, ३२३ उमेदवार, ३.१२ कोटी मतदार

In the fourth phase, the BJP Shiv sena seats target by Congress & NCP | चौथ्या टप्प्यात भाजप, सेनेच्या बालेकिल्ल्यात चुरस

चौथ्या टप्प्यात भाजप, सेनेच्या बालेकिल्ल्यात चुरस

Next

मुंबई : प्रामुख्याने भाजप-सेना युतीचा बालेकिल्ला असलेल्या खान्देश आणि मुंबई प्रदेशातील लोकसभेच्या १७ मतदारसंघांत चौथ्या टप्प्यात येत्या २९ रोजी मतदान होत आहे. सर्वच्या सर्व १७ ठिकाणी सेना-भाजप युतीचे खासदार असून या जागा आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने चंग बांधला आहे. केंद्रीय मंत्री सुभाष भामरे (धुळे), काँग्रेसचे मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई) आणि प्रिया दत्त (मुंबई उत्तर-मध्य) यांच्यासह प्रथमच निवडणुकीत उतरलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (मुंबई -उत्तर) तसेच राष्ट्रवादीकडून शरद पवारांचे नातू पार्थ पवार (मावळ) आणि मालिकेतील संभाजीराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) यांचा त्यामध्ये समावेश आहे. १७ पैकी ८ जागी भाजप, तर ९ जागी शिवसेनेला विजय मिळाला होता.

राज्यात प्रथमच चार टप्प्यांत मतदान होत असून शेवटच्या टप्प्यात मुंबई खान्देशसह पश्चिम महाराष्ट्रातील शिर्डी (अहमदनगर), मावळ आणि शिरूर (पुणे) यासह १७ मतदारसंघांत मतदान होत आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, दिंडोरी, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मावळ, शिरूर आणि शिर्डी या मतदारसंघांचा चौथ्या टप्प्यात समावेश आहे.

सर्वाधिक मतदार!
या टप्प्यात सर्वाधिक ३ कोटी ११ लाख ९२ हजार ८२३ मतदार हक्क बजावणार असून ३२३ उमेदवार रिंगणात आहेत. ३३ हजार १४ मतदान केंद्रांवर १ लाख ७ हजार ७७९ ईव्हीएम मशीन, तर ४३ हजार ३०९ व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे.
वारसदार लढतीत

शेवटच्या टप्प्यात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे वारसदार भाग्य अजमावित आहेत. त्यात पार्थ अजित पवार (मावळ), डॉ. हिना विजयकुमार गावित (नंदुरबार), मिलिंद मुरली देवरा (दक्षिण मुंबई), समीर भुजबळ (छगन भुजबळ यांचे पुतणे), पूनम महाजन (दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या), प्रिया दत्त (सुनील दत्त यांच्या कन्या) (उत्तर मध्य मुंबई), आनंद प्रकाश परांजपे (ठाणे) यांचा समावेश आहे.

Web Title: In the fourth phase, the BJP Shiv sena seats target by Congress & NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.