कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते भरत जाधव यांचे वडील गणपत हरी जाधव (वय ८७, राहणार काशीद कॉलनी, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) यांचे शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर आज, शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्वत: टॅक्सीचालक असणाऱ्या जाधव यांनी अत्यंत कष्टातून भरत जाधव यांचे करिअर घडविले. त्यामुळे जाधव कुटुंबीयांचा आधारवड कोसळल्याची भावना व्यक्त झाली.
जाधव हे पत्नी शांता तसेच पुतणे यांच्यासोबत साने गुुरुजी वसाहत येथील घरात राहत होते. वयोमानामुळे त्यांना प्रकृतीचा किरकोळ त्रास होता. शुक्रवारी रात्री साडेसात वाजता त्यांना थोडे अस्वस्थ वाटू लागले. रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरू असतानाच आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त भरत यांच्यासह त्यांचे भाऊ किरण व राजू जाधव व बहीण छाया यांना कळविण्यात आले. मात्र ते मुंबईला असल्याने रात्रीच कोल्हापूरला निघाले. आज, शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.
गणपत जाधव हे व्यवसायाने टॅक्सीचालक होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. त्यांनी केलेल्या संस्कारांमुळे भरत जाधव यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपले करिअर केले. भरत आणि दोन्ही भाऊ मुंबईला राहत असले तरी दर आठवड्याला कोल्हापुरात येऊन ते वडिलांची चौकशी करून त्यांच्यासोबत वेळ घालवून जायचे. भरत यांचा वडिलांवर अतिशय जीव होता. वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी दहा वर्षांपूर्वी साने गुरुजी वसाहत येथे बंगला विकत घेतला होता. (प्रतिनिधी)
व्ही. शांताराम यांचे चालक
ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम कोळेकर तिकटी येथे राहायचे; तर गणपत जाधव यांचे बेलबागेत घर होते. व्ही. शांताराम कोल्हापुरातून मुंबईला स्थायिक झाल्यानंतर त्यांनी आपल्यासोबत जवळच्या माणसांनाही नेले. त्यात जाधव यांचा समावेश होता. नंतर ते व्ही. शांताराम यांच्या गाडीचे चालक म्हणून काम करू लागले. कोल्हापूर हे मूळ गाव आणि जोतिबा कुलदैवत त्यामुळे वृद्घापकाळात त्यांनी कोल्हापुरातच राहणे पसंत केले.
-----------------