निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शेतकऱ्यांचा पुळका कसा? राजू शेट्टींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 09:03 AM2019-06-25T09:03:02+5:302019-06-25T09:04:10+5:30

नेमके निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपणाला कंठ फुटलेला आहे. पाच वर्षात शेतकऱ्याचे किती प्रश्न सोडवलात,

farmer leader Raju Shetty Criticized Shiv Sena on farmers issue | निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शेतकऱ्यांचा पुळका कसा? राजू शेट्टींचा टोला

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शेतकऱ्यांचा पुळका कसा? राजू शेट्टींचा टोला

googlenewsNext

मुंबई - गेली पाच वर्षे राज्यातील शेतकरी दारिद्र्यात खितपत पडले आहेत. शेतकर्यांचे अनेक प्रश्न उग्र रूप धारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, उलट त्यामध्ये वाढ होत गेली आहे. अशा अनेक शेतकरी प्रश्नावर उद्धव ठाकरे कधीच कडक शब्दात बोललेले ऐकीवात नाही. मग शेतकऱ्यांचा आत्ताच कसा तुम्हाला पुळका आला? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिवसेनेला केला आहे.  

राजू शेट्टी यांनी सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, गेल्या चार वर्षातच बारा हजार शेतकऱ्यांनी शेतीच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला भाव मिळालेला नाही. 17 जून 2017 रोजी राज्य शासनाने कर्जमाफी केली मात्र अद्यापही राज्यातील सुमारे तीस लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही.  34 हजार कोटी माफी केली असताना केवळ 19 हजार कोटींची कर्जमाफी झालेले आहे असं असताना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आत्ताच तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कसे काय बोलू लागला आहात असा थेट सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. 

तसेच शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही, मुंबईत कार्यालय असणाऱ्या कार्पोरेट कंपन्यानी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिकविम्यात लूट केलेली आहे हे गेली तीन वर्ष चालू असताना अचानक आताच तुम्हाला साक्षात्कार कसा काय झाला. तिकडे राज्यातील शेतकरी दुष्काळाने ग्रस्त आहे, त्याला खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, टॅंकर माफीयाने उच्छाद मांडला आहे , चारा छावण्यात घोटाळे होत आहेत. या प्रश्नाकडे तुम्ही करड्या नजरेने कधीच बघितले नाही अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. 

विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली सत्तेच्या लोण्याचा गोळा मटकविण्यासाठी जास्त जागांची गरज वाटू लागली तशी अचानक तुम्हाला शेतकऱ्यांची आठवण झाली ही तुमची सवय तशी जुनीच आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही गर्जना केली “पहिले मंदिर फिर सरकार “ आणि जागावाटप पुर्ण होताच तुमची भूमिका बदलली “पहले सरकार फिर मंदिर” आता निवडणुका आल्या की पुन्हा तुम्ही एकमेकासोबत भांडत बसणार आहे असंही राजू शेट्टी यांनी सांगितले. 

दोघात भांडायचं व निवडणुका जिंकायच्या आणि पुन्हा सत्तेचे गाठोडे घेऊन पळून जायचं हा डाव आता शेतकऱ्यांच्या लक्षात आला आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही.  विजेचा प्रश्न आ वासून उभा आहे. दुष्काळाने  शेतकरी होरपळत चालला आहे.  सिंचन योजना जशाच्या तशा आहेत, राज्यामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे यावर आपण गप्प राहिलात. नेमके निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपणाला कंठ फुटलेला आहे. पाच वर्षात शेतकऱ्याचे किती प्रश्न सोडवलात, किती शेतकऱ्यांना न्याय दिलात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावच लागेल असा घणाघातही शेट्टींनी शिवसेनेला केला. 

दरम्यान कृषी क्षेत्राचा आर्थिक प्रगतीचा वेग वजा आठ टक्यापर्यंत खाली घसरला आहे. म्हणूनच शेती क्षेत्राची ही दुरावस्था झालेली आहे. अर्थात याला जबाबदार ना महाराष्ट्रातील जनता आहे ना महाराष्ट्रातील शेतकरी सरकारच फसलेलं धोरण हेच एकमेव कारण आहे. त्यामुळे तुम्हाला जबाबदारी टाळता येणार नाही. तुम्हीही या सरकारचे भागीदार आहात हे उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी जाणतो आहे असंही राजू शेट्टींनी सांगितले. 

Web Title: farmer leader Raju Shetty Criticized Shiv Sena on farmers issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.