धर्मा पाटलांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन; वारसांना मिळणार 54 लाखांचा मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 12:04 PM2018-02-13T12:04:35+5:302018-02-13T12:04:44+5:30

पाटील कुटुंबीयांना अवघे ४ लाख ३ हजार रुपयांचा मोबदला मिळाला होता.

Farmer Dharma patil family gets 54 lakh compensation for land | धर्मा पाटलांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन; वारसांना मिळणार 54 लाखांचा मोबदला

धर्मा पाटलांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन; वारसांना मिळणार 54 लाखांचा मोबदला

Next

मुंबई: सरकारकडे वारंवार दाद मागूनही न्याय न मिळाल्याने मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केलेले धुळयाचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमुल्यांकनाची प्रक्रिया अखेर पार पडली आहे. त्यानुसार धर्मा पाटील यांच्या वारसांना संपादित केलेल्या जमिनीसाठी 54 लाखांचा मोबदला मिळणार आहे.  धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी ऊर्जा विभागाला सादर केला आहे. यापूर्वी सरकारकडून याच जमिनीचे भूसंपादन केल्यानंतर सरकारने पाटील कुटुंबीयांना अवघ्या ४ लाख ३ हजार रुपयांचा मोबदला दिला होता. 

दरम्यान, सरकारकडून नव्याने देण्यात येणाऱ्या या मोबदल्यात मनरेगा कायद्यातील तरतुदीनुसार सानुग्रह अनुदानाचा समावेश आहे. तसेच संपादनावेळी या जमिनीवर असलेल्या आंब्याच्या झाडांचे मूल्यही विचारात घेण्यात आले आहे. त्यानुसार शासनाकडून धर्मा पाटील यांच्या नावे 28 लाख 5 हजार 984 रुपये तर त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना 26 लाख 42 हजार 148 रुपयांचा मोबदला मान्य करण्यात आला आहे. इतर 12 प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनाही वाढीव मोबदला मिळणार आहे.

दोंडाई येथे उभारण्यात येणाऱ्या वीज प्रकल्पासाठी विखरण शिवारात गट क्रमांक २९१/२ अ मधील शेतकरी धर्मा पाटील यांची पाच एकर शेतजमिन सरकारने संपादित केली होती. परंतु, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाटील कुटुंबीयांना अवघे ४ लाख ३ हजार रुपयांचा मोबदला मिळाला. तर त्यांच्या शेजारी असलेल्या शेतमालकास गुंठाभर जमिनीसाठी एक कोटी ८९ लाखांचा मोबदला मिळाला होता. धर्मा पाटील यांना हा मोबदला मान्य नव्हता. धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडे होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती होती. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला होता. मात्र, सरकारकडून न्याय न मिळाल्याने २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तातडीने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती. 

Web Title: Farmer Dharma patil family gets 54 lakh compensation for land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.