- स्वाती जोशी
एकत्र कुटुंब किंवा आजवर परंपरागत पद्धतीने नजरेसमोर असलेल्या कुटुंबांची व्याख्या बदलत गेली, बदलत चालली आहे. मूल होऊ न दिलेल्या, एकट्या व्यक्तीने तंत्रज्ञानाचा वापर करून मूल जन्माला घालून कुटुंबाची हौस पूर्ण केलेल्या घटना भोवताली घडताहेत. कदाचित, उद्याची कुटुंबे अशीही असतील. मध्यंतरीच्या कुटुंबांत आत्या, काका, मामा, मावशी हळूहळू कमी झाले. पुढे कदाचित आई किंवा वडिलांपैकी कुणी एकच असू शकेल. कशीही
असली, तरी कुटुंबात जोवर नात्यांची वीण घट्ट आहे, तोवर त्यात ओलावा आहे... जागतिक कुटुंब दिनानिमित्त याच नात्यांचा मागोवा...
माझ्या घरातल्यांना मी उद्या पार्टीसाठी बोलवणार आहे. आपण तयारीला लागू यात. साधारण २६ जण आहेत, माझ्या घरात. परी बोलून जाते. तिच्या मित्रमैत्रिणींना माहीत असते की, हिची फॅमिली खूप मोठी आहे. पण, २६ जण एकाच कुटुंबात ही बाब काही त्या एकलदुकल फॅमिलीवाल्यांच्या पचनी पडत नाही. मग, ते परीची खूप चेष्टा करतात. म्हणजे, तुम्ही सिनेमाला जाता तेव्हा थिएटर बुक करत असाल ना, एकत्र फिरायला निघाल्यावर तुमच्या सगळ्यांच्या गाड्यांमुळे वाहतूककोंडी होत असेल ना वगैरे... आणि सहज प्रश्न येतो काय गं, एवढे कोणकोण आहेत तुझ्या घरात... परी अगदी सहज उत्तर देते, माझे आजोबा, नऊ काका, तितक्याच काकू, आठ भावंडे...
‘दिल दोस्ती दोबारा’ या मालिकेतला हा प्रसंग. ही मालिका अगदी आजच्या पिढीची आहे. त्यात अगदी पक्क्या एकत्र कुटुंबातली मुलगी परी आहे. खरंच, एवढ्या मोठ्या कुटुंबाची कल्पना आज जे चाळिशी-पन्नाशीत आहेत, त्यांनीही केलेली नसेल. म्हणजे, त्या पिढीतही तीनचार भावंडांपुरतेच कुटुंब सीमित झाले होते. हा, आता त्याच्याही मागच्या पिढीत मात्र कुटुंबात कितीही मुले असत. त्यामुळे कुटुंबाचा आकार प्रचंड मोठा असे, पण तो काळ आता खूपच मागे पडला.
गेली अनेक वर्षे ‘हम दो हमारे दो’ किंवा एकच हा मंत्र मध्यमवर्गीयांनी अंगीकारला. त्यामुळे आईवडील आणि दोन मुले किंवा मग एक... अशा चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंबांचे प्रमाण आपल्या समाजात वाढत गेले. याच काळात अगदी आपल्याला मूल हवंच का, असा बंडखोर विचार करणारी जोडपीही दिसायला लागली होती. त्यामागे त्यांच्याही काही धारणा होत्या. त्यात मुलाला वाढवण्यासाठी किंवा त्याला चांगला नागरिक घडवण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, असे सांगणारे होते. तर, आपलेच मूल कशाला हवे? दुसऱ्या प्रकारेही आम्ही आमचे पालकत्व पूर्ण करू शकतो, असेही सांगणारे होते. मला लहान मुले विशेष आवडत नाहीत, म्हणून मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला, असे धाडसी विधान करणाऱ्या महिलाही होत्या. पण, ही तिची कबुली खळबळ उडवणारी ठरे. कारण, प्रत्येक स्त्रीला मुलाबाळांची आवड असलीच पाहिजे, हे आपल्या समाजाने गृहीत धरले होते. म्हणजे, कुटुंब हे तयार केलेच पाहिजे, अशीच ही धारणा.
मला माझ्या कुटुंबात माझेच मूल हवे असे नाही, तर ती गरज मी एखाद्या अनाथ मुलामुलीला दत्तक घेऊनही पूर्ण करू शकतो, हा विचारही गेल्या पिढीत सुरू झाला. तसेच स्वत:चे एक मूल असतानाही दुसरे मूल दत्तक घेण्याचे प्रमाणही या काळात वाढले होते. त्यापूर्वी मूल दत्तक घेतले जायचे, पण त्यासाठी गरीब नातेवाइकांच्या मुलाला प्राधान्य दिले जायचे आणि मूल होत नसेल, तरच हा विचार केला जायचा.
मला माझे कुटुंब पूर्ण करायचे आहे. माझ्यातली मातृत्वपितृत्वाची तहान भागवायची आहे, पण त्यासाठी इतर नात्यांचा गुंता नको, असा विचार करणाऱ्यांची संख्याही आता वाढू लागली आहे. त्यातून, मग दत्तक किंवा सरोगसीतून मूल जन्माला घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. या एकल पालकांना आपले कुटुंब तर तयार करायचे आहे... पण, खरं बघता हे कुटुंब असेल का? या कुटुंबाला परिपूर्ण तरी कसे म्हणणार? पण, या गोष्टींचाही स्वीकार समाज करायला लागला आहे. घरी मी आणि माझी आई आम्ही दोघेच असतो, हे वाक्य आता फारसे धक्कादायक वाटत नाही. पण, एका पूर्ण कुटुंबाचे कवच त्या मुलांना मिळणार नसेल, तर त्यांच्या मानसिकतेचे काय, त्यांच्या आयुष्यावर नक्की काय परिणाम होतील, हे येणारा काळच ठरवेल.
एकंदरीतच, कुटुंबातील सदस्यांची संख्या किंवा कुटुंबाचा परीघ आक्र सत चालला. माझी मैत्रीण, तिचा नवरा घरातील एकुलते एक अपत्य. त्यांनाही एकच मुलगी. तिची मुलगी मैत्रिणीला कायम म्हणते, अगं आई, तुला-बाबाला चुलत-आत्ये-मामे भावंडे आहेत, म्हणून मला काका-मामा-मावशा-आत्या ही नाती तरी कळताहेत. पण, माझ्या मुलांचे काय होणार? त्यांना ही नाती कधीच कळणार नाहीत. कारण, मला चुलत-मामे-मावस-आत्ये अशी कुणीच भावंडे नाहीत. पिढी बदलली की, नात्यांतील दुरावाही वाढतो. त्यामुळे तिचे म्हणणे काहीच चुकीचे नाही.
कुटुंब म्हणजे असते तरी काय? आपल्याकडे घर आणि कुटुंब यांच्यात फार फरक असत नाही. आपण पटकन म्हणतो, माझ्या घरी माझे आजीआजोबाही असतात. म्हणजे, जेथे आपल्याला प्रेम आणि सुरक्षिततेची भावना मिळते आणि ज्यांच्यामुळे हे मिळते, ती माणसे म्हणजे आपले कुटुंब. या कुटुंबामुळे अनेक नाती निर्माण होतात किंवा अनेक नात्यांतून कुटुंब तयार होते. कुटुंब म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर आजी-आजोबा-काका-काकू इत्यादी-इत्यादी नाती उभी राहतात. पण, आता घरात इनमीन तीन किंवा चार डोकी. त्यातही प्रत्येक जण आपापल्या व्यापात गुंतलेला. त्यामुळे एका छताखाली राहूनही चार दिशांना चार तोंडे अशी स्थिती थोड्याफार फरकाने अनेक घरांत आढळून येते. मी बहुसंख्य घरांत म्हणत नाही. पण, अनेक घरांत मात्र नक्की असते. पिढीतील अंतरामुळे आणि तंत्रज्ञानाच्या माऱ्यामुळे कुटुंबातला दुरावा वाढत चालला आहे. संवाद साधण्यासाठी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पूर्वी बरं होतं नाही का? या काकाशी नाही पटलं, तर दुसरा आहे बोलायला. बाबांशी अबोला धरला, तर आत्या आहे समजवायला. पण, आता हे अंतर पार करायचे कसे आणि या अंतरातला पूल बनणार कोण, असा प्रश्न भेडसावू लागला आहे. याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तर शोधले जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम ही समाजमाध्यमे आणि त्यातील मित्रमैत्रिणीच परिवार बनू लागले आहेत. फिल्ािंग सॅड, फिलिंग लोन्ली असे लिहायचे दु:ख व्यक्त करणारा इमोजी टाकायचा आणि मनातल्या भावना मोकळ्या करायच्या. मग, त्यावर येणाऱ्या लाइक्स, रिप्लाय, कमेंट यातूनच मनाने सावरायचे, असा हा धोकादायक खेळ सुरू आहे. आपला मित्रमैत्रीण दु:खी का आहे, त्याला-तिला एकटं का वाटतंय हे एकदा विचारू तरी, असं खरंच या आभासी विश्वातल्या परिवाराला वाटते का? हा प्रश्न आहे. ‘नाही रे यार, सहज लिहिलं असेल. असेल काही तरी प्रॉब्लेम आपण कमेंट दिली ना झाले काम’, असा विचार बळावतोय आणि तो फक्त किशोरवयीन किंवा तरुण मुलांच्यात नाहीतर अगदी चाळिशी-पन्नाशीच्या पिढीतही रु जतोय. हा सर्वात मोठा धोका आहे, कुटुंब व्यवस्थेला. कारण, यातून संवाद म्हणजे इमोजी आणि लाइक्स वगैरेवगैरे हेच भावना व्यक्त करण्याचं समीकरण बनू पाहत आहे. यापुढे जाऊन पालक बनणाऱ्या पिढीला यातला फोलपण उमगण्यासाठी त्यांच्या पालकांना तो समजला पाहिजे. ही समाजमाध्यमे वाईट नाहीत. पण, त्याच्या किती अधीन व्हायचे, हे ठरवले तर खरंच तीही कुटुंबातील एखाद्या घटकाप्रमाणेच होतील.
टीव्ही वाहिन्यांवर कोणत्या मालिकांना चांगला प्रेक्षकवर्ग मिळतो, याचा विचार केला तर, एकत्र कुटुंब, त्यातील चांगले प्रसंग, त्यात साजरे होणारे सण यालाच अधिक प्रेक्षक मिळतो, असे अनेकदा सिद्ध झाले आहे. असे का होते, तर एकत्र कुटुंबाचे चित्र प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हवे असते, पण ते मिळत नाही म्हणून या आभासी दुनियेतून त्याचा आनंद मिळवला जातो. गेली अनेक वर्षे सुरू असलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय होण्यामागे इतर अनेक कारणे असली, तरी त्यात दाखवलेले सोसायटीचे चित्रण खूप सुखावह आहे. एकत्र गुण्यागोविंदाने नांदणारी कुटुंबे बघण्याचा आनंद मिळतो. आपल्याला हे मिळत नाही, याचे दु:खही अनेकांना असते. म्हणूनच याला पे्रक्षक मिळतो. यातूनच समाजात आजही कुटुंब आणि विस्तारित कुटुंबाची गरज अधोरेखित होते.
आपल्याकडे ‘वसुधैव कुटुम्बकम’ हे तत्त्व मानले जाते. थोडक्यात पूर्ण जग हे आपलेच आहे, ही भावना तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्षात आली आहे. जग हाच एक परिवार बनू पाहत आहे. असे असताना याची मुळे असलेले आपले कुटुंब जपले पाहिजे. ते संवादी आणि प्रवाही बनवले पाहिजे. सतत चिंता व्यक्त होत असूनही कुटुंबव्यवस्था टिकून आहे. ती टिकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कुटुंबव्यवस्था टिकेल की नाही, ही चिंता नाही, तर ती कुटुंबे निरोगी आणि संवादी आहेत का, याची आहे. तसे कुटुंब निर्माण करून नातेसंबंधांची वीण घट्ट करण्याची जबाबदारी प्रत्येकांचीच आहे. ती सर्वांनी नीट पार पाडली तर आपल्या फेसबुकवॉलवर आपण ट८ ॅ१ीं३ी२३ ३१ीं२४१ी ्र२, ६ं२ ंल्ल िं’६ं८२ ६्र’’ ुी े८ ों्र’८! हे लिहून अभिमानाने नक्की शेअर करू शकू नाही का?


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.