दुष्काळाच्या झळा; राजापुरात ६८ विहिरी, तरीही पाण्याचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 10:43 AM2019-05-15T10:43:43+5:302019-05-15T10:51:31+5:30

सांगोला तालुक्यातील शिवारं पडलेत कोरडठाक; पाझर तलावातील विहीर केव्हाचीच आटलेली

Due to drought; There are 68 wells in Rajapura, yet there is no water address | दुष्काळाच्या झळा; राजापुरात ६८ विहिरी, तरीही पाण्याचा पत्ता नाही

दुष्काळाच्या झळा; राजापुरात ६८ विहिरी, तरीही पाण्याचा पत्ता नाही

Next
ठळक मुद्देअंतर्गत मतभेदामुळे छावणी प्रतीक्षेतचएका टँकरद्वारे पाणीपुरवठादूध व्यवसायावर शेतकºयांचा उदरनिर्वाह

अरुण लिगाडे 

सांगोला : भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाºया राजापूर गावाच्या घशाला पडलेली कोरड कुणाचंही मन पिळवटून टाकेल, अशी आहे. ना गावाला रस्ता नीट आहे, ना कोणत्याही सिंचन योजनेतून पाणी! केवळ पावसावर शेती व पिण्याच्या पाण्याची भिस्त! शिरभावी योजनेचे पाणी आलेच नाही तर गावाला पाणी... पाणी म्हणून घशाला कोरड पडते. म्हैसाळ योजनेतून बंद पाईपद्वारे गावाला पाणी मिळाले तर गाव कायमस्वरुपी दुष्काळमुक्त होईल, पण हा सुखाचा दिवस केव्हा उगवेल, याचा खुद्द सरपंच बाबुराव तोडकरी यांनाही भरवसा नाही.

मंगळवारी दु. २ च्या सुमारास राजापूर गावाला भेट दिली असता हे वास्तव जाणवले. भीषण दुष्काळामुळे गाव परिसरातील शिवारच्या शिवार ओस पडल्याचे दिसून आले. गावातील विहिरींनी तर कधीचाच तळ गाठलेला. गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. गावातील पारावर गप्पा मारत या तरूणांचा वेळ चाललाय. महिला आपापल्या दारात गुरांना वैरण-पाणी करुन शेण-घाण काढत असल्याचे दिसून आले. पाणीच नाही तर शेतात पिकवायचे तरी काय, असा प्रश्न घरच्या ज्येष्ठांना आणि कर्त्यांना पडलेला ! 
सांगोला तालुक्यातील ६४० लोकसंख्येचे व १३६ कुटुंबसंख्या असलेले उंचवट्यावरील राजापूर गाव सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. सलग तीन वर्षे पावसाने हुलकावणी दिली. गावपरिसरात सुमारे ६८ विहिरी आहेत. मात्र त्या कोरड्या-ठणठणीत पडल्या आहेत. गावातील आडात पाणी नसल्यामुळे आता त्याचा वापर केरकचºयासाठी होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी पाझर तलावातील विहिरीवर सर्वांच्याच आशा. मात्र या विहिरीनेही केव्हाचाच दम सोडलाय.

अंतर्गत मतभेदामुळे छावणी प्रतीक्षेतच
- चालू वर्षी भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांचा चारा व पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झालाय़ शेतकरी पशुधन कसे जगवायचे या विवंचनेत असून महागडा चारा आणून पशुधन जगविणे सुरू आहे. तालुक्यात सर्वत्र जनावरांच्या छावण्या सुरु झाल्या असल्या तरी राजापूर गावात अंतर्गत मतभेदामुळे जनावरांची छावणी प्रतीक्षेत आहे. राजापूर गावाचा म्हैसाळ योजनेत समावेश करुन बंद पाईपद्वारे गावाला पाणी मिळावे, अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षक सुखदेव कदम यांनी केली आहे.

एका टँकरद्वारे पाणीपुरवठा
- गावातील दहा हातपंपांपैकी पुजारी वस्ती व कदम वस्ती येथील हातपंप चालू स्थितीत आहेत तर राजापूर गावांतर्गत पुजारवस्ती व तोडकरी वस्तीला एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.

दूध व्यवसायावर शेतकºयांचा उदरनिर्वाह
- गावातील ११०० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ५० एकरांवर डाळिंबाची लागवड आहे, त्याही बागा पाण्याअभावी जळालेल्या अवस्थेत उभ्या आहेत. केवळ पावसाच्या पाण्यावर खरीप व रब्बी हंगामातील ज्वारी, बाजरी, मका हीच मुख्य पिके घेतली जातात. मात्र पाऊसमान कमी झाल्यामुळे शेती व्यवसाय पुरता अडचणीत सापडल्याने गावातील प्रत्येक जण दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे. गतवर्षी पावसाअभावी खरीप व रब्बी हंगामातील पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी बाहेरुन ४ हजार रूपये टनाने ओले मकवान, ऊस तर ३ हजार रूपये शेकडा दराने कडबा आणून दुभती जनावरे जगवली जात आहेत. त्यामुळे गावात दररोज सकाळ-संध्याकाळचे २५०० लिटर दूध संकलित होत असल्याने  या व्यवसायावरच शेतकºयांचा उदरनिर्वाह सुरु आहे.

राजापूर गावाला जोडणाºया चोहोबाजूंच्या रस्त्याची दुरुस्ती न केल्यामुळे ग्रामस्थांना या खडतर रस्त्यावरुनच प्रवास करावा लागतो, हे गावाचे दुर्दैव आहे.
- ऋषीकेश पाटील, उपसरपंच

राजापूर गावाला पाणी फाउंडेशनकडून १ लाख रूपयांचे बक्षिस मिळाल्याने त्या पैशातून जलसंधारणाची कामे सुरु आहेत तर नरेगामधून बांधबंदिस्तीच्या कामावर ४० मजूर काम करीत आहेत.
- बाबुराव तोडकरी, सरपंच

सन १९७६ ते १९९२ या कालावधीत गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी कोणतेही साधन नसताना गावाशेजारील असणाºया बाबासाहेब तोडकरी यांच्या विहिरीतून त्याकाळी अख्ख्या गावाला पाणीपुरवठा व्हायचा. परंतु पाऊसच नसल्याने आज ही विहीर कोरडी ठणठणीत पडली आहे.
- समाधान राजमाने, ग्रामस्थ

Web Title: Due to drought; There are 68 wells in Rajapura, yet there is no water address

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.