सांगली : भाजपच्या कवलापूर (ता. मिरज) येथील प्रचार सभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य असल्यामुळे सभेला जावे लागले. या सभेत व्यासपीठावरील सर्वांना
भाजपचे मफलर कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर तो माझ्याही गळ्यात घातला होता, पण मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, असे स्पष्टिकरण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी दिले.
भाजपच्या सभेसाठी मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी कृषी राज्यमंत्री खोत यांनी भगवा कुर्ता आणि भाजपचा मफलर गळ्यात घातल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उलट-सुलट चर्चा होती. या पार्श्वभूमीवर खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विधानसभा
आणि लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर आघाडी होती. त्यावेळी भाजपच्या उमेदवारांचा मी प्रचार केला होताच.
वाळवा तालुक्यात तर राष्ट्रवादीचे बडे नेते माजी मंत्री यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपसह समविचारी पक्षांबरोबर आम्ही रयत विकास आघाडी केली आहे. असे असताना, मी भाजपच्या सभेला उपस्थित राहिल्याचा वेगळा संदेश काही मंडळींकडून जाणिवपूर्वक पसरविला जात आहे, तो पूर्णत: चुकीचा आहे. (प्रतिनिधी)

दानवेंकडूनही स्पष्टीकरण
सदाभाऊ खोत हे भाजपाला पाठिंबा देत असले तरी त्यांना भाजपामध्ये आणण्याचे कोणतेही प्रयत्न सुरू नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिले़