- डॉ. मनोहर कामत

रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट (रेरा) लागू झाल्यापासून ग्राहक आणि विकासक यांच्यामधील संभ्रम वाढला आहे. या कायद्याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने विकासक याचा फायदा उठवत आहेत. ग्राहकांनी ‘रेरा’विषयी गैरसमज करून घेतल्यास त्याविषयी नकारात्मकता वाढत जाऊन ग्राहकांचे नुकसान होणार. त्यामुळे ‘रेरा’चा प्रसार व्हावा, यासाठी सरकारने विशेष कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता आहे.
गेल्या काही वर्षांत घरांच्या, जमिनींच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने या क्षेत्रातील भ्रष्टाचार वाढीला लागला आहे. यामध्ये अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते; पण या सर्व गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी ‘रेरा’ कायदा आणला आहे; पण या कायद्याविषयी जनसामान्यांना फक्त प्रसिद्धी माध्यामांतर्फेच माहिती मिळाली आहे. यातही फक्त हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या सकारात्मक तरतुदींना प्रसिद्धी मिळाली आहे. या व्यतिरिक्त कायद्याला मिळालेली प्रसिद्धी ही नकारात्मकतेकडे झुकणारी आहे.
‘रेरा’ लागू झाल्यानंतर जागांची नोंदणी केल्यास तुमचे नुकसान होईल. त्यामुळे ‘बॅक डेटेड’ नोंदणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. विकासकांमुळे ग्राहक हे पाऊल उचलत आहेत. अशापद्धतीने अवैध काम करणे चुकीचे आहे. त्यामुळे ग्राहकांनी अशी घरांची नोंदणी करणे टाळावे. विकासक ‘रेरा’ कायद्याची भीती दाखवत असल्यास त्याच्याकडे पुरावे मागावेत. विकासक सांगत आहे म्हणून नोंदणी करू नये.
‘रेरा’ कायदा लागू झाल्यास आमची कंपनी डुबली, तर तुमचे पैसेही बुडतील ही भीती ग्राहकांना घातली जाते. त्यामुळे अनेक ग्राहक घाबरले आहेत; पण अशा प्रकारची तरतूद या कायद्यात नाही. वेळच्या वेळी हफ्ता न भरल्यास ग्राहकांचे पैसे जप्त केले जाणार आहेत. कायद्याविषयीची संपूर्ण माहिती सामान्यांपर्यंत पोहोचली नसल्याने याचा फायदा विकासक उचलत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. सरकारने कायदा अमलात आणला; पण सामान्यांसाठीदेखील हा कायदा असल्याने त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी सरकारने विशेष कार्यक्रम आखले पाहिजेत. चर्चासत्रांचे आयोजन करायला हवे. माहितीपुस्तिका काढल्यास त्याचा अधिक फायदा होईल.