रवींद्र देशमुख/ ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 2 -  युवक कलावंत गुणी आहेत. त्यांनी खूप परिश्रम घेतले पाहिजेत. थोडशा यशावर हुरळून जाऊन प्रसिध्दीच्या मागे लागू नये. रिअ‍ॅलिटी शोंमध्ये जाऊन 'एसएमएस'ची भीक तर नक्कीच मागू नये. जे मागायचे ते देवी सरस्वतीकडे मागावे, असे आवाहन किराना घराण्याचे विख्यात शास्त्रीय संगीत गायक पं. अजय पोहनकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना केले.
पं. पोहनकर यांची श्रीक्षेत्र गाणगापूर येथे संगीत सेवा होती. त्यानिमित्त ते येथे आले आहेत. कुंभारी येथे डॉ. वासुदेव रायते यांच्या निवासस्थानी पोहनकर मुक्कामाला आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ह्यलोकमतह्ण आणि दर्डा परिवाराशी असलेल्या स्नेहाचा उल्लेख करून त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, नवीन पिढी खूप हुशार आहे. त्यांना शास्त्रीय संगीत आवडते; पण या संगीताकडे अधिकाधिक युवा रसिकांना आकर्षित करण्यासाठी राग संगीत रटाळ करायला नको. जुनं ते सोनं असतं, हे खरं आहे; पण जुनाट ते कधीच सोनं असू शकत नाही. आजच्या पिढीतील युवा कलावंतांनी शास्त्रीय संगीतात मोठे यश मिळविलेले आहे. अजय पोहनकर हा ह्यक्लासिकल की बोर्डह्ण चा जागतिक दर्जाचा कलावंत आहे. सतारवर निलाद्रीकुमार लोकप्रिय झालेली आहे. उस्ताद अमजद अलींची दोन्ही मुले सरोदचे जागतिक दर्जाचे कलावंत आहेत. कौशिकी चक्रवर्ती उत्तम गायिका आहे, असा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला.
राग संगीत का शिकायचे? या प्रश्नावर ते म्हणाले, जोपर्यंत शास्त्रीय संगीत माहिती नसते, तोपर्यंत अन्य संगीतावर हुकमत मिळविता येणार नाही. त्यामुळे ज्यांना संगीतामध्ये करिअर करायचे आहे किंवा संगीत कला आत्मसात करायची आहे, त्यांनी राग संगीत शिकलेच पाहिजे. मी माझ्या आईकडून डॉ. सुशीलाबाई पोहनकर यांच्याकडून राग संगीत शिकलो. मातोश्री जबलपूर विद्यापीठात संगीत विभागाच्या प्रमुख होत्या. त्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. वडील वकिल होते. त्यांना संगीताची आवड होती.
युवा कलावंत हल्ली रिअ‍ॅलिटी शोमध्ये रमलेले दिसतात. त्यांनी तेथे आपला वेळ घालवू नये. त्यापेक्षा रियाज करावा. या शोज्मधून उगीचच ह्यएसएमएसह्णची भीक मागू नका. त्यापेक्षा संगीत आत्मसात होण्यासाठी सरस्वती मातेकडे भरपूर मागा, असे आवाहन पं. पोहनकरांनी केले. सोलापूरसारख्या शहरात शास्त्रीय संगीताच्या मैफिली होतात, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
पं. पोहनकरांना राष्ट्रीय पुरस्कार
पं. अजय पोहनकर यांना नुकताच डॉ. गंगूबाई हंगल राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हुबळी येथे ८ जानेवारी रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. १ लाख रूपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पं. पोहनकर यांनी आनंद व्यक्त केला.