असंतोषाचा भडका, महाराष्ट्र बंदला हिंसक वळण, कोरेगाव भीमा, वढू येथील घटनेचे राज्यभरात पडसाद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 05:41 AM2018-01-04T05:41:03+5:302018-01-04T05:41:32+5:30

कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे सोमवारी झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी महाराष्ट्रभर उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे गालबोट लागले.

 Disturbance of Maharashtra, violent turn of Maharashtra bandh, Korgaon Bhima, Wadhoo | असंतोषाचा भडका, महाराष्ट्र बंदला हिंसक वळण, कोरेगाव भीमा, वढू येथील घटनेचे राज्यभरात पडसाद  

असंतोषाचा भडका, महाराष्ट्र बंदला हिंसक वळण, कोरेगाव भीमा, वढू येथील घटनेचे राज्यभरात पडसाद  

Next

मुंबई -  कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे सोमवारी झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी महाराष्ट्रभर उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे गालबोट लागले. जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी व बसचे चालक गंभीर जखमी झाले, तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे शीघ्रकृती दलाच्या जवानांनी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

आंबेडकरी कार्यकर्ते सकाळपासूनच मोठ्या संख्यने रस्त्यांवर उतरल्याने सगळीकडे चक्का जाम झाला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह सर्व मार्गावरील ठिय्या आंदोलने आणि ठिकठिकाणी रेलरोकोमुळे मुंबईची चहूबाजुंनी कोंडी झाली. चेंबूर नाका येथे स्कूलबसवर झालेल्या दगडफेकीनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. कोल्हापुरात भीमसैनिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला.
जमावाने शेकडो वाहनांची जाळपोळ केली. बीड आणि चंद्रपूरमध्ये भाजपा आमदारांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, तर पुण्यात हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्या घरावर जमाव चालून गेला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित घटना टळली. राज्यभर संतप्त पडसाद उमटत असतानाही पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत आंदोलन चिघळू दिले नाही. सायंकाळी ४ वाजता अ‍ॅड. आंबेडकर यांनी बंद मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र, तोपर्यंत राज्यभर असंतोषाचा भडका उडालेला होता.
कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारामागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप करत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. बंदला महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी, जातीमुक्त आंदोलन परिषद, एल्गार परिषद व संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता.

कोणाचीही गय नाही
कोरेगाव-भीमा येथे जी काही घटना घडली आहे, त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करून जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अटक होईल ही अपेक्षा
कोरेगाव भीमामधील हिंसेला जबाबदार असलेले शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना अटक केली जाईल, अशी अपेक्षा बाळगून आम्ही हा बंद मागे घेत आहोत. बंदसाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी जनतेचे अभिनंदन करतो, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

संघ कार्यालयावर फेकली पेट्रोलची बाटली
परभणी येथे दुपारी दोन वाजता काही अज्ञात इसमांनी बसस्थानक ते रेल्वेस्टेशन मार्गावर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात खिडकीतून पेट्रोलची पेटती बाटली आत फेकली. त्यामुळे काही पुस्तके आणि साहित्य जळाले.

आर्थिक फटका राज्यातील ३५ लाख किरकोळ विक्रेत्यांचे सुमारे 700 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा दावा फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे विरेन शहा यांनी केला आहे.
वाहतूकदारांना मोठा फटका वाहतूकदार व सरकारच 2000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केला.

लाठीमारात विद्यार्थ्याचा मृत्यू
हदगाव (जि. नांदेड) : घटकचाचणीचा पेपर देण्यासाठी जात असलेल्या योगेश प्रल्हाद जाधव (१६) या दहावीच्या विद्यार्थ्याला आंदोलनकर्ता समजून जलदगती कृती दलाच्या जवानांनी बेदम मारहाण केली़ यात त्याचा मृत्यू झाला़ त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाईल, असे राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

निलंग्यात १० पोलीस जखमी
निलंगा शहरात संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत दहा पोलीस व काही नागरिक जखमी झाले. परिणामी, प्रशासनाने निलंगा शहरात काही काळ संचारबंदी लागू केली. तिथे एसआरपीच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.

मंत्रालयातही शुकशुकाट
मंत्रालयातही शांतता पाहायला मिळाली. एरव्ही, मंगळवार आणि बुधवारी राज्यभरातून आपली निवेदने आणि मागण्यांसाठी नागरिक मंत्रालयात गर्दी करतात. बुधवारी मात्र, मंत्रालयात येणाºयांची संख्या तुरळकच होती.

Web Title:  Disturbance of Maharashtra, violent turn of Maharashtra bandh, Korgaon Bhima, Wadhoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.