2019 नंतरही मीच मुख्यमंत्री; फडणवीसांचा पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 03:33 PM2018-10-07T15:33:50+5:302018-10-07T15:37:03+5:30

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याचे सूतोवाच

devendra fadnavis says he will continue as chief minister after 2019 | 2019 नंतरही मीच मुख्यमंत्री; फडणवीसांचा पुनरुच्चार

2019 नंतरही मीच मुख्यमंत्री; फडणवीसांचा पुनरुच्चार

Next

लातूर: आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्री असेन, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरण आणि सेवासुविधांसाठी तीन टप्प्यात 100 कोटींचा निधी देण्यात येईल. यातील पहिला टप्प्यातील निधी लगेच, दुसऱ्या टप्प्यातील निधी पुढील वर्षात आणि तिसरा टप्पादेखील माझ्याच कार्यकाळात मिळेल. कारण 2019 नंतरही मीच मुख्यमंत्री असणार आहे, असं फडणवीस यांनी केला. ते अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 

लातूरमध्ये बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्याचे सूतोवाच केले. राज्यात विशेषत: मराठवाड्यात दुष्काळजन्य स्थिती आहे. पंचनामे वेगाने सुरू आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत टंचाईची स्थिती समोर येईल. त्यानंतर केंद्रीय पथकाची पाहणी पूर्ण झाल्यावर दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट संकेत देत मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी सरकार मागे हटणार नाही, अशी ग्वाही दिली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठे काम झाले. परंतु मराठवाड्यात ७० टक्के व त्यापेक्षा कमी पाऊस झाला. या कठीण परिस्थितीत सरकार जनतेच्या पाठीशी आहे. गत सरकारच्या १५ वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना ७ हजार कोटींची मदत मिळाली. मात्र आम्ही चार वर्षांत २२ हजार कोटींची मदत दिली. १५ वर्षांत ४५० कोटींचा शेतमाल खरेदी केला होता. या सरकारने चार वर्षांत ८ हजार ५०० कोटींचा शेतमाल खरेदी केला आहे. चार लाख घरकुले पूर्ण झाली. सहा लाख पूर्ण होतील. सन २०२२ पर्यंत १२ लाख बेघरांना घर दिले जाईल. त्यात सन २०१९ पर्यंत १० हजार लोकांना घरे मिळतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयुष्यमान भारत योजनेचीही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आयुष्यमान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी योजना असून त्याअंतर्गत ५० कोटी लोकांना मोफत उपचार मिळणार आहेत. महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री आरोग्य साहाय्य योजना या माध्यमातून ९० टक्के लोकांना आरोग्य सेवेचे कवच मिळाले आहे. सरकार तर आहेच, पण दानशूरही मदत करत आहेत. आयुष्यमान आरोग्य योजनेमध्ये ग्रामीण भागातही दर्जेदार खाजगी आरोग्य सेवा मिळतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

यावेळी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, केवळ भौतिक विकास पुरेसा नाही़ सामाजिक संतुलनासाठी आरोग्यदायी जीवन आवश्यक आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या योजनांमुळे कोणीही उपचारापासून वंचित राहणार नाही. याप्रसंगी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी लातूरला भरभरून दिले आहें त्यांचे नागपूरपेक्षा लातूरवर अधिक प्रेम आहे.  
 

Web Title: devendra fadnavis says he will continue as chief minister after 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.