- अ. पां. देशपांडे

प्रत्येक व्यवसायाची परिभाषा वेगवेगळी असते. ती आपल्याला लगेच समजते, असेही नाही. मात्र, थोडे प्रयत्न केल्यास ती जरूर समजू शकते. उदा. लावणी, पेरणी, वखरणी, मळणी, औत, राब, पायली, अधोली, मापटे, चिपटे हे सगळे शेतीतील शब्द आणि क्रिया आपल्याला अपरिचित आहेत, पण तरीही शेतीतील परिभाषा कशी आहे, ते आता पाहू.

ऊस शेतीसाठी पूर्व तयारीचे वर्ष आणि फेरपालटीची पिके याबद्दल आपल्या ‘ऊस संजीवनी’ पुस्तकात डॉ. बाळकृष्ण महादेव जमदग्नी लिहितात की, उसाचे एकरी १०० टन उत्पादन घेण्यासाठी केवळ लागवडीच्या हंगामापुरता विचार करून चालत नाही. खोडवा ऊस गेल्यानंतर त्यात पुन्हा त्याच वर्षी नवीन लागवड करू नये. खोडवा गेल्यानंतर पाचट न जाळता कुट्टी करून घ्यावी. रोटोवेटर फिरविला की पालाकुट्टी होते. यानंतर खोल नांगरट करावी. जमीन चांगली तापू द्यावी. उन्हाळ्यात जमीन तापल्याने काही महत्त्वाच्या घटना घडतात.
* उन्हाची किरणे जमिनीच्या ढेकळाना भेदून आतपर्यंत जातात. त्यामुळे पूर्वी उसाला दिलेल्या खतापैकी जमिनीत घट्ट स्थिरावलेले अन्नघटकांचे बंदिस्त कण मोकळे होतात.
* जमीन तापल्यानंतर मातीतले अ‍ॅक्टीनोमायसेटस व इतर उपयुक्त जीवाणू चेतविले जातात. अशा तापलेल्या मातीवर वळवाचा पाऊस पडताच, ते जागे होतात. त्यांच्या क्रियेतून स्राव निघतो व मातीचा सुगंध पसरतो.
* जमिनीच्या वेगवेगळ्या थरांत असलेली किडींची अंडी, अळ्या, कोष जमिनीवर येतात. कडक उन्हाने काही मरतात. काहींचे भक्षण पक्षी करतात.
* आरंभी घट्ट असलेली मातीची ढेकळे ठिसूळ व विरविरीत होतात. पहिल्या पावसात विरून जातात.
* वळवाचा पाऊस ३० मिमी असेल, तर जमिनीतील हुमणीचे भुंगे बाहेर पडून शेताच्या सभोवतालच्या कडुनिंब, बाभळी किंवा गुलमोहोर अशा झाडाझुडपावर बसतात. तेथील पाने खातात. संध्याकाळी त्यांचे मीलन होते व मादीभुंगे शेतामध्ये रोज एक अशी ६० दिवस अंडी घालतात. त्या हुमणीचा पुढे पिकाला उपद्रव होतो. म्हणून याच वेळी नियंत्रण करावे. त्यासाठी अशा झाडांवरील भुंग्यांना मिथील पॅरॉथिआॅन (२%) २० कि. / एकर भुकटी धुरळावी. या प्रकारे हुमणीचे नियंत्रण करता येते. झाडे हलवून ते गोळा करून मारणेही शक्य असते. अशा झाडांच्या जवळपास एरंड, करंज, निंबोळी यांचा भरडा ठेवल्यास, त्याकडे हुमणीचे नर आकर्षित होतात. त्यांचा नायनाट करावा.
फेरपालटीची पिके
वळवाचा पाऊस झाल्यावर रान तयार करावे. मृग नक्षत्रात आपल्या भागातील खरीप हंगामाची शक्यतो कोरडवाहू कडधान्य पिके घ्यावीत. बेवड चांगला होतो. यामध्ये भुईमूग, सोयाबीन, मूग, घेवडा, चवळी, उडीद अशी खरिपाची पिके घ्यावीत. या पिकांच्या प्रत्येकी ४ ते ६ ओळींनंतर तुरीची एक ओळ पेरावी. खरिपाची कडधान्ये निघाल्यावर, आॅक्टोबर-नोव्हेंबरात हरभरा घ्यावा. याचे बरेच फायदे आहेत.
* या सर्व पिकांची पाने जमिनीवर गळून एकरी दोन टन सेंद्रिय घटक शेतात पसरला जातो.
* मूल्यावरील गाठीतून नत्राचे स्थिरीकरण होते.
* विशेषत: तुरीच्या मुळ्या खोलवर जातात व जमीन भुसभुशीत होते. सर्व पिकांच्या मुळ्या जमिनीत तशाच राहतात. सूक्ष्म जीवाणूंना दीर्घ काळ खाद्य मिळते.
* या कडधान्यांच्या मुळातून व पानातून जे स्राव व सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळले जातात, त्यांना अ‍ॅलेलो केमिकल्स म्हणतात. त्यामुळे पुढच्या पिकाला जोम येतो. यालाच बेवड म्हणतात.
* तुरीचे एकरी ४-५ क्विंटल, भुईमूग ७-८ क्विंटल, मूग, उडीद, हरभरा यांचे प्रत्येकी ५ ते ८ क्विंटल उत्पादन मिळते.
* कडधान्यांना बाजारभाव चांगला मिळतो. अशा प्रकारे बेवड करून जमीन पुन्हा नांगरावी व एप्रिल अखेर तापवावी.
सेंद्रिय खतांनी बळकट करणे
कडधान्यांचा बेवड झाल्यानंतर, मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कारखान्यात मिळणारे प्रेसमडपासून बनविलेले कम्पोस्ट खत एकरी १० टन पसरावे. एकरी २ टन कोंबडी खत, २ ते ४ टन शेणखत किंवा लेंडी खत पसरावे. रोटोवेटर मारून जमिनीत चांगले मिसळावे. यानंतर, अडीच ते तीन फूट (शक्यतो अडीच फूट) रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात प्रत्येक सरीत धेन्चा किंवा तागाचे एकरी २५ ते ३० किलो बी पसरावे. यासोबत एकरी दोन गोण्या सुपर फॉस्फेट व दोन गोण्या जिप्सम पसरावे. बैलाच्या औताने मातीत मिसळावे. हलके पाणी द्यावे. जूनअखेरीस ताग/धेन्चा फुलावर आल्यावर मोडून सरीत घालावा. यावर एक गोणी युरिया व दोन गोणी सिंगल सुपर फॉस्फेट व दोन गोण्या जिप्सम (जमिनीत चुनखडी नसेल तर) पसरावे. सरीच्या जागी वरंबा व वरंब्याच्या जागी सरी तयार करावी. युरिया, सुपर फॉस्फेट व जिप्सम यामुळे सेंद्रिय खते कुजविण्याच्या जीवाणूंना नत्र व सल्फर मिळतो. एकरी हमखास १०० टन ऊस घ्यायचा असेल, तर जुलै-आॅगस्टमध्ये आडसाली लागण करावी. काही परिस्थितीत हे शक्य नसेल, तर ताग किंवा धेन्चा गाडल्यानंतर, चवळी, घेवडा असे एखादे कडधान्य पीक घ्यावे किंवा पुन्हा एकदा धेन्चा किंवा ससबेनिया रोस्त्रेटा हा प्रकार क्रम बदलून घ्यावा.