ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19 -  हा देश हिंदू राष्ट्र आहे त्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवले होते, तर त्या नावावर सहमती होत नसेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेली व्यक्ती म्हणून डॉ. स्वामिनाथन यांचे नाव सांगितले होते. पण भाजपाने दलित मतांवर डोळा ठेवून भाजपाने दलित उमेदवार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यावा याबाबत उद्या होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

 आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपावर पुन्हा एकदा शरसंधान केले. 51 वर्षं जुना पक्ष आहे यावर विश्वास बसत नाही. शिवसेनेचे सर्व वर्धापन दिन पाहिलेत, तोच उत्साह आणि तीच जिद्द अजूनही पक्षात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. " राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना काय भूमिका घेते याकडे देशाचे लक्ष लागले आहे. हीच शिवसेनेची ताकद आहे. हा देश हिंदू राष्ट्र आहे त्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवले होते, तर त्या नावावर सहमती होत नसेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेली व्यक्ती म्हणून डॉ. स्वामिनाथन यांचे नाव पुढे केले होते. पण दलित समाजाच्या मतांवर डोळा ठेवून रामनाथ कोविंद यांचे नाव भाजपाने पुढे केले आहे. दलित मतांसाठी कोविंद यांचं नाव पुढे केलं असेल तर आम्हाला रस नाही. दलित समाजाची मतं घेण्यासाठी जर दलित राष्ट्रपती देणार असाल तर शिवसेना पाठिंबा देणार नाही," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. राष्ट्रपती निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यावा याबाबत उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

-शिवसेनेच्या पहिल्या वर्धापन दिनापासून आतापर्यंत उत्साह कायम

-केवळ मतांचे राजकारण करणार असेल त्यात शिवसेना कधीच पडणार नाही

-  दलित समाजाची मतं घेण्यासाठी जर दलित राष्ट्रपती देणार असाल तर शिवसेना पाठिंबा देणार नाही

-हा देश हिंदू राष्ट्र आहे त्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवले होते

-शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेली व्यक्ती म्हणून डॉ. स्वामिनाथन यांचे नाव पुढे केले

-शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी 

-वेड्या वाकड्या अटी टाकून शेतकऱ्यांना गांगरुन टाकणार असाल तर ते कागद मी फाडून टाकेन

 - शेतकऱ्यांना द्यायचं असेल तर मोकळ्या मनानं आणि सढळ हातानं द्या 

-कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रात कानडी सरकार मराठी बांधवांवर भाषिक अत्याचार

-मध्यावधीची पर्वा नाही, पण शेतकरी आत्महत्यांची चिंता वाटते