संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीवरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 05:02 AM2019-06-19T05:02:40+5:302019-06-19T05:04:11+5:30

मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनात केलेल्या बदलावरून नवा वाद उभा ठाकला आहे.

Debate on the new method of numerology | संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीवरून वाद

संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीवरून वाद

Next

पुणे : मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनात केलेल्या बदलावरून नवा वाद उभा ठाकला आहे. त्यामुळे मराठी भाषेची मोडतोड होत असल्याची टीका मराठी भाषासमर्थक, साहित्य वर्तुळातून होत आहे. तर हा बदल मागील वर्षी इयत्ता पहिलीपासूनच केला आहे, त्यामुळे टीका करणाऱ्यांनी किमान पहिली आणि दुसरीची पुस्तके चाळावीत, अशा शब्दांत ‘बालभारती’च्या गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्षा डॉ. मंगला नारळीकर यांनी त्यास उत्तर दिले आहे. ‘बालभारती’तर्फे गणिताच्या पुस्तकात २१ ते ९९ या संख्यांचे वाचन व लेखन यात बदल केला आहे. तेवीसऐवजी वीस तीन, सत्त्याण्णवऐवजी नव्वद सात अशा प्रकारे वाचन व लेखन शिकवले जाणार आहे. काही विद्यार्थी पारंपरिक पद्धतीने गणित शिकले असतील. त्यामुळे दोन्ही प्रकारचे शब्द ग्राह्य धरावेत. शब्दात संख्या लिहिताना विद्यार्थ्यांना नवी पद्धत सोपी असल्याचे अनुभवता येईल, असे ‘बालभारती’तर्फे पुस्तकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले आहे.
डॉ. मंगला नारळीकर म्हणाल्या की, इंग्रजी व चार दाक्षिणात्य भाषांमध्येही संख्या वाचन असेच केले जाते. पण हे त्यांचे अनुकरण नसून ते सोपे वाटले म्हणून घेतले आहे. त्यामागे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे, हा एकमेव उद्देश आहे. तर, हे इंग्रजी लॉबीचे कारस्थान दिसते आहे. हे त्वरित थांबवण्यासाठी शासनाला निवेदन पाठवण्याची गरज असल्याचे साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी सांगितले.

गणिताच्या अभ्यासक्रमातील संख्यावाचनाच्या निर्णयाचे आपण स्वागत केले पाहिजे. गणिताबद्दल विनाकारण भीती निर्माण होते. त्यामुळे मुलांची मानसिकता समजून घेऊन हा बदल केला आहे. संख्याबदल हा गणिताचा विषय आहे. साहित्यिकांचा थेट गणिताशी संबंध येत नसल्याने त्यांनी विरोध करण्यात अर्थ नाही.
- लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष

पाठ्यपुस्तक मंडळाच्या दोन्हीपैकी एक निवडा, या भूमिकेस विरोध आहे. शिकताना सत्तर तीन त्र्याहत्तर चालेल, पण संख्या त्र्याहत्तरच म्हणावी. ग्रामीण भागात शाळेत न गेलेल्या महिलांनाही शंभरपर्यंत आकडे येतात. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकोबांची मराठी संपवू नका. - रामदास फुटाणे, साहित्यिक

Web Title: Debate on the new method of numerology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा