जमीर काझी 
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईतील तीन मालमत्तांचा अखेर मंगळवारी लिलाव करण्यात आला. भेंडीबाजारातील पाकमोडिया स्ट्रीट परिसरातील हॉटेल, गेस्ट हाउस व सहा खोल्यांसाठी तब्बल ११ कोटी ५८ लाखांची बोली लागली. दाऊदी बोहरा समाजाच्या सैफी बुºहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने (एसबीयूटी) सर्वोच्च बोली लावली.
आठ वर्षांत केंद्रीय वित्त मंत्रालयाने दाऊदच्या मुंबईतील मालमत्ता विकण्यासाठी चार वेळा लिलाव प्रक्रिया घेतली होती. मात्र, दहशतीमुळे खरेदीदार पुुढे येत नव्हते.
मंगळवारी चर्चगेट येथील आयएमसीच्या इमारतीत किलाचंद कॉन्फरन्स रूममध्ये आॅनलाइन पद्धतीने लिलाव झाला. ‘स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅन्युप्युलेटर्स (एसएएफईएमए) अधिनियम १९७६ च्या अन्वये ही प्रक्रिया झाल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी हॉटेल अफरोजसाठी ज्येष्ठ पत्रकार बालाकृष्णन यांनी सर्वोच्च बोली लावली होती. मात्र, त्यांना निर्धारित मुदतीत पूर्ण रक्कम भरता आली नव्हती.
मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार असलेल्या दाऊदच्या देशभरातील मालमत्ता केंद्र सरकारने जप्त केल्या आहेत. त्यांची टप्प्याटप्प्याने विक्री केली जात आहे.
तीन आठवड्यांमध्ये उर्वरित रकमेचा
भरणा केल्यानंतर, या मालमत्ता ‘एसबीयूटी’च्या नावावर केल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.
बोली जिंकण्यात चक्रपाणी अपयशी
हॉटेल रौनकच्या खरेदीसाठी हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी लिलावात सहभागी झाले होते. मात्र, ते बोली जिंकण्यात अपयशी ठरले. चक्रपाणी यांनी मागील लिलावात दाऊदच्या मालकीची मोटार ३२ हजाराला विकत घेतली होती. त्यानंतर, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जाऊन दहशतवादाचा निषेध म्हणून ती जाळली होती. दाऊदचे हॉटेल विकत घेऊन तेथे सार्वजनिक शौचालय उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता.
बुºहानी ट्रस्ट कोणाचा?
दाऊदी बोहरा समाजातर्फे सैफी बुºहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) चालविला जातो. त्याचे मुख्यालय भेंडीबाजार परिसरात आहे. सैय्यदना मोहम्मद बुराणी यांची शिकवण व मार्गदर्शनाखाली या ट्रस्टची स्थापना झाली आहे. ट्रस्टकडून भेंडीबाजार पुनर्वसनाचा प्रकल्प राबविला जात आहे. संबंधित मालमत्ता पुनर्वसन प्रकल्पात येत असल्याने, एसबीयूटीने लिलावात सहभाग घेतला.