लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी देशाचे भले करणारा लायक उमेदवार हवा. केवळ दलित समाजाची मते मिंळविण्यासाठी रामनाथ कोविंद यांच्या रूपाने दलित चेहरा पुढे करण्यात आला असेल तर त्यात आम्हाला रस नाही, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळे संकेत दिले. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत उद्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचेही ते म्हणाले.
शिवसेनेच्या ५१व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक, अमित शहा यांची ‘मातोश्री’ भेट या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. पण अमित शहा यांच्याबाबत उद्धव यांनी आपल्या भाषणात चकार शब्द काढला नाही. मात्र, राष्ट्रपतीपदासाठी भाजपाने रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे करून दलित मतांचे राजकारण खेळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मात्र त्यांनी भाषणात केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत मंगळवारी शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत भाजपाच्या नावावर चर्चा करू. सीमा अशांत आहे, काश्मीर पेटलंय, गोरखा मुक्तीचे आंदोलन पुन्हा पेटले असून अशा स्थितीत ही निवडणूक होत आहे. देशाचे भले करणारा उमेदवार दिल्यास आमचा भाजपाला पाठिंबा आहे. पण, दलित मतांसाठी उमेदवार दिला असेल तर त्यात शिवसेनेला रस नाही, असे उद्धव म्हणाले. भाजपाकडून फक्त निवडणुकांचे राजकारण सुरू आहे. राज्याराज्यातील लोकसंख्या पाहून गोहत्या बंदीचे निर्णय घेतले जात आहेत. मग, देशभर समान नागरी कायदा कसा लागू करणार, असा सवाल उद्धव यांनी केला. तसेच हिंदूंच्या हितासाठी स्वच्छ मनाने आम्ही मोहन भागवतांचे नाव सुचविले होते. त्यांच्या नावाबाबत काही अडचण असेल तर शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असणाऱ्या स्वामीनाथन यांचे नाव पुढे केले होते, असेही ठाकरे म्हणाले.
मध्यावधी निवडणुकांबाबत भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत उद्धव म्हणाले की, सदासर्वदा तुम्हीच निवडून याल या भ्रमातून बाहेर या. राज्यातील वातावरण बदलत आहे. शेतकरी पेटलाय. त्यामुळे आम्हाला मध्यावधीची धमकी देऊ नका. हिंमत असेल तर आता निवडणुका घ्या आम्ही तयार आहोत. २०१४ साली जे हुकले ते मिळवण्यासाठी शिवसैनिक ठिणगी नव्हे तर वणव्याप्रमाणे पेटून उठतील आणि भगवा फडकेल, अशा शब्दांत उद्धव यांनी भाजपाचा समाचार घेतला. मध्यावधी निवडणुकांपेक्षा शेतकरी आत्महत्यांची आम्हाला चिंता आहे. कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत सरकारला सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनात नुसता हात नाही तर शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे. वेड्यावाकड्या अटी टाकून शेतकऱ्यांना गांगरून टाकणार असाल तर तो कागद मी फाडून टाकेन. शेतकऱ्यांना मोकळ्या मनाने आणि सढळ हाताने कर्जमाफी द्या, अशी मागणी उद्धव यांनी केली.