सातारा, दि. 13 - गोळीबार करून पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी रविवारी सकाळी त्यांची धिंड काढली. पोलीस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत या आरोपींना चालवत नेण्यात आले. वीस ते पंचवीस सशस्त्र पोलिसांसह बुरखा घातलेले आणि बेड्या ठोकलेले आरोपी मुख्य बाजारपेठेतून जात असताना नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. 
वडगाव हवेलीतील पेट्रोल पंपावर टाकण्यात आलेल्या दरोड्यात पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. या टोळीकडून पिस्तूल, जिवंत काडतूस, तलवारींसह अनेक घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. रविवारी सकाळी या टोळीला अतिरीक्त व जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलीस ठाण्यापासून शाहू चौक, दत्त चौक, यशवंत हायस्कुलमार्गे सिटी पोस्टाकडून दरोडेखोरांना चालवत नेण्यात आले. सशस्त्र पोलीस बंदोबस्तात मुख्य बाजारपेठेतून निघालेली ही दरोडेखोरांची धिंड पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरीक उभे होते. 


न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा दरोडेखोरांना सिटी पोस्टाकडून शालिमार लॉज, गुजर हॉस्पिटल, बसस्थानकमार्गे दत्त चौकापर्यंत चालवत नेण्यात आले. यावेळी रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाली होती. दरोडेखोरांच्या या रपेटमुळे नागरीकांमधील आरोपींविषयीची दहशत कमी होणार असल्याची चर्चा होती.            


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.