महिला आयोग उभारणार सायबर डेस्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 05:59 AM2018-05-09T05:59:17+5:302018-05-09T05:59:17+5:30

फेसबुक, टिष्ट्वटरवर महिलांच्या विरोधात अनेकदा अवमानकारक, मानहानीकारक भाषा वापरली जाते. महिलांविरोधात अश्लील वक्तव्ये केली जातात. अशा प्रकारांना रोखण्यासाठी ‘सायबर डेस्क’ सुरू करण्यासोबतच, याविषयी जनजागृतीसाठी राष्ट्रीय पातळीवर परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय राज्य महिला आयोगाने घेतला आहे.

 Cyber ​​desk to set up women commission | महिला आयोग उभारणार सायबर डेस्क

महिला आयोग उभारणार सायबर डेस्क

मुंबई : समाज माध्यमांचा वापर वाढला असला, तरी त्यांच्या नियमनाची कोणतीच यंत्रणा सध्या भारतात अस्तित्वात नाही. विशेषत: फेसबुक, टिष्ट्वटरवर महिलांच्या विरोधात अनेकदा अवमानकारक, मानहानीकारक भाषा वापरली जाते. महिलांविरोधात अश्लील वक्तव्ये केली जातात. अशा प्रकारांना रोखण्यासाठी ‘सायबर डेस्क’ सुरू करण्यासोबतच, याविषयी जनजागृतीसाठी राष्ट्रीय पातळीवर परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय राज्य महिला आयोगाने घेतला आहे.
समाज माध्यमांतील महिलाविरोधी प्रकारांना आळा घालण्यासाठी आयोगाने स्थापन केलेल्या समितीची मंगळवारी पहिली बैठक पार पडली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सायबर सिक्युरिटीवर काम करणारे प्रशांत माळी, वैशाली भागवत, सोनाली पाटणकर, मुक्ता चैतन्य यांच्यासह पोलिस दलातील सायबर तज्ञ उपस्थित होते. समाज माध्यमातील चर्चेत महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारची अवमानकारक टिप्पणी करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्याची दखल घेत महिला आयोगाने तज्ज्ञ समितीची स्थापना केली.
देशात सायबर कायदे, सायबर सेल असले, तरी समाज माध्यमांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी त्याचा फारसा उपयोग होत नाही. हे गैरप्रकार रोखण्याचे काम कोणत्या यंत्रणेने करावे, याचीच स्पष्टता नाही. शिवाय, फेसबुक आणि टिष्ट्वटरसारख्या कंपन्या सर्व्हर परदेशात असल्याचे सांगत, सरकारी यंत्रणांची बोळवण करतात, अशी भावना बैठकीत सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे विशेष सायबर डेस्क उभारणे, याविषयी जनजागृतीसाठी राष्ट्रीय स्तरावर परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय, याप्रकरणी आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने नियमित बैठका घेऊन तीन महिन्यांत अहवाल सादर करावा, असा निर्णय घेण्यात आला.

Web Title:  Cyber ​​desk to set up women commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.