मुंबई/ठाणे : देशात मोठा घातपात घडवण्यासाठी दहशतवाद्यांची साखळी तयार करणाऱ्या मुंब्य्रातील मुख्य सूत्रधारासह चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार आणि पंजाब एटीएसने केलेल्या संयुक्त कारवाईत इसिसचा मोठा कट उधळला गेला आहे.
मुंब्रा येथून अटक करण्यात आलेला मूख्य सूत्रधार नजीम उर्फ उमर शमशाद अहमद शेख (२६) हा मूळचा उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथील रहिवासी असून, तो इसिसच्या वतीने दहशतवादी कारवायांसाठी नवीन तरुणांना सहभागी करून घेण्याचे काम करत असे. त्यासाठी त्याने १० ते १२ जणांचा एक ग्रुप बनविला आहे. दहशतवादी संघटनेसाठी पैसे पुरविणे, त्याची माहिती गोळा करणे तसेच अन्य सहकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम तो करायचा. गेल्या वर्षभरापासून तो मुंबई परिसरात राहत आहे. मुंब्रा येथील देवरीपाडा येथील अक्रम मंजिल इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर तो भाड्याने राहायचा. तो राहत असलेला फ्लॅट शेहजाद अख्तर यांच्या मालकीचा आहे. त्याच्यासोबत गुलफाम आणि उजैफा अबरार हे ५ एप्रिलपासून राहण्यास आले होते. ते दोघे आपले नातेवाईक असल्याची माहिती नजीम शेजारच्यांना देत असे. उमर या टोपणनावाने तो अन्य साथीदारांसोबत बोलत होता. नजीम याच्याकडून एक लाख ६५ हजार ३५० रुपयांची रोकड आणि मोबाइल हस्तगत करण्यात आले.
काही दहशतवादी घातपात घडवण्याचा कट रचत तरुणांचे ब्रेनवॉश करत असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या एटीएसला मिळाली होती. त्यानुसार पाच राज्यांतील ९ पोलिसांच्या पथकाने मुंबईसह उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबमधून नजीमसह चार जणांना अटक केली. यात नजीमसह पंजाबमधून गाजी बाबा उर्फ मुजम्मिल उर्फ जिशान, बिजनौरमधून मुफ्ती उर्फ फैजान आणि जकवान उर्फ अहतेशाम उर्फ एसके उर्फ मिंटू याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. यात गाजी आणि मुफ्तीकडे धार्मिक भावना दुखावून वातावरणात तणाव निर्माण करण्याची जबाबदारी होती. तर जकवान सदस्यांच्या खर्चासाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था करत होता. त्यांच्यासह सहा संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये नजीमचे सहकारी गुलफाम आणि उजैफा अबरार यांचाही समावेश आहे.

गेल्या वर्षी इसिसच्या म्होरक्याला अटक
एटीएसने इसिससाठी तरुणांची भरती करणाऱ्या मुद्दबीर शेख यास गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात अटक केली होती. तो इसिसचा भारतातील प्रमुख कमांडर होता. त्याच्यासोबत देशभरातून आणखी १४ जणांना एटीएसने अटक केली होती.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांपैकी एक विवाहित आहे. नजीम हा मुंब्रा परिसरात लहान मुलांसाठीच्या पेप्सीविक्रीचा व्यवसाय करीत होता. तर संशयित म्हणून ताब्यात घेतलेला गुलफाम मुंब्य्रात अंडीविक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

नोएडा कनेक्शन
या कारवाईत संशयितांच्या चौकशीतून नोएडा कनेक्शनही समोर येत आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशची एटीएस टीम अधिक तपास करत असल्याचे बोलले जाते.