कोरेगाव-भीमा घटनेचे राज्यभर पडसाद, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 04:31 AM2018-01-03T04:31:34+5:302018-01-03T04:31:52+5:30

कोरेगाव भीमा (जि.पुणे) येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद आज राज्यात ठिकठिकाणी उमटले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगरसह अन्य ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. तर काही ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. दगडफेकीचे किरकोळ प्रकार वगळता राज्यात सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे.

 Crime in the state of Karegaon-Bhima incident, Sambhaji Bhide, Milind Ekbote | कोरेगाव-भीमा घटनेचे राज्यभर पडसाद, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा

कोरेगाव-भीमा घटनेचे राज्यभर पडसाद, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा

मुंबई : कोरेगाव भीमा (जि.पुणे) येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद आज राज्यात ठिकठिकाणी उमटले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगरसह अन्य ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. तर काही ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. दगडफेकीचे किरकोळ प्रकार वगळता राज्यात सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्र्तींमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्या (बुधवारी) महाराष्टÑ बंदची हाक दिली आहे.
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक लढाईला १ जानेवारी रोजी २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वढू येथे राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी आलेले होते. पुरेसा पोलीस बंदोबस्तदेखील त्या ठिकाणी होता. मात्र, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण व्हावी हा काही जणांचा प्रयत्न होता. अशा प्रवृत्तींपासून सावध राहून नागरिकांनी शांतता व संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
कोरेगाव भीमा दुसºया दिवशीही तणावाखालीच आहे. परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सकाळी गृहराज्यमंत्री
दीपक केसरकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी दाखविलेला संयम व स्थानिकांचे सहकार्य मिळाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
दलित, मराठा, ओबीसी व बहुजन बांधवांनी घटनेचा निषेध करावा. यामागील ‘मास्टर मार्इंड’ पोलिसांनी शोधावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे यांनी केले आहे.

मृत व्यक्तीच्या कुटुंबास
१० लाख रुपयांची मदत
हिंसाचाराच्या घटनेत झालेल्या एका मृत्यूची चौकशी सीआयडीमार्फत केली जाईल आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबास १० लाख रुपयांची मदत दिली जाईल. या शिवाय, ज्यांच्या वाहनांची तोडफोड झालेली आहे त्यांना नुकसानभरपाई राज्य शासनाच्या वतीने दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. समाज माध्यमांतून अफवा पसरविणाºयांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी बजावले.
संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे
यांच्यावर गुन्हा दाखल
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी शिवजागर प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (गुरुजी) व हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या अनिता साळवे यांनी या दोघांविरोधात तक्रार दिली आहे. अ‍ॅट्रॉसिटी, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव जमविणे व असंघटित गुन्हेगारी आदी कलमान्वये हा गुन्हा दाखल केला आहे.
सखोल चौकशी करा - आठवले
गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी हजारो-लाखो कार्यकर्ते येतात. पण कधीही अनुचित प्रकार घडला नाही. काही लोकांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांनी हिंसा भडकावली, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी केली.
शांतता पाळा, न्यायिक चौकशी
अमान्य - प्रकाश आंबेडकर
मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली न्यायिक चौकशी मला मान्य नाही. न्यायिक चौकशीला दंडात्मक अधिकार नसतात. त्यामुळे अशी चौकशी म्हणजे निव्वळ धूळफेक ठरण्याची शक्यता आहे. सरकारने न्यायिक चौकशीचे आदेश देवू नयेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आजी न्यायधीशाची नियुक्ती करण्याची विनंती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना करावी. तसेच चौकशीसाठी नेमलेल्या न्यायधीशांकडे दंडात्मक कारवाईचे अधिकार द्यावेत, अशी मागणी प्रकाश आंबडेकर यांनी केली. चौकशीसाठी दलित न्यायधीशाची नेमणूक करू नये, असेही ते म्हणाले.
हिंसाचारामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा आरोप करत महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी, जातीमुक्त आंदोलन परिषद, पुणे येथील एल्गार परिषदेसाठीच्या अडीचशे संघटनांचे फ्रंट, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांच्यावतीने बुधवारी महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी जाहीर केले. लोकांनी शांततेत बंद पाळाचा तसेच आम्ही बंद पुकारतोय म्हणून इतर संघटनांनी बंद मोडण्याचे काम करू नये, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.
‘मास्टर मार्इंड’ शोधा - संभाजी ब्रिगेड
दलित, मराठा, ओबीसी व समस्त बहुजन बांधवांनी एकत्रितपणे या विकृत घटनेचा निषेध करावा. तसेच या घटनेमागील ‘मास्टर मार्इंड’ पोलिसांनी शोधावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे यांनी केले आहे.
लोकशाही मार्गाने लढा देऊ - चव्हाण
दलित आणि मराठा समाजात भांडणे लावून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा काही समाजविघातक प्रवृत्तीचा डाव असल्याचे सोमवारच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. लोकशाही मार्गाने लढा देऊन हा कुटील राजकीय डाव हाणून पाडण्याची आवश्यकता असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
अहमदनगरला २६ बस फोडल्या
मंगळवारी नगरसह श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी आणि राहाता येथे पडसाद उमटले़ जमावाच्या दगडफेकीत नगर-श्रीगोंदा येथे प्रत्येकी एक, तर राहाता बसस्थानकात तीन महिला जखमी झाल्या़ जिल्ह्यात २६ बस व चार ते पाच कारचे नुकसान झाले.
बस चालकाला जाळण्याचा प्रयत्न
जळगावमध्ये बस चालक जगतराव लोटन पाटील यांच्या अंगावर आगीचे गोळे फेकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला. ते किरकोळ जखमी झाले व बालंबाल बचावले.
कोल्हापुरात दुचाकींची मोडतोड
कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, निदर्शने करून घटनेचा निषेध करीत आंबेडकरी समाज, पक्ष व संघटनांतर्फे बुधवारी बंदची हाक देण्यात आली. काही दुचाकींची तोडफोड झाली.

Web Title:  Crime in the state of Karegaon-Bhima incident, Sambhaji Bhide, Milind Ekbote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.