अनेकांच्या बोटांवर बसलाय कासव!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 10:09 PM2018-07-16T22:09:26+5:302018-07-16T22:12:43+5:30

कासवाची अंगठी घालण्याची क्रेझ वाढली : कासव धनप्राप्ती, धैर्य शांतीचे प्रतीक असल्याची समजूत

craze of tortoise ring | अनेकांच्या बोटांवर बसलाय कासव!

अनेकांच्या बोटांवर बसलाय कासव!

googlenewsNext

नितीन गव्हाळे

अंधश्रद्धा एवढी मानगुटीवर बसली आहे, की लोक काहीही धारण करतात. अलीकडच्या दोन-तीन वर्षांपासून कासव अंगठीची प्रचंड क्र्रेझ वाढली असून, अनेकांच्या हातातील बोटांवर कासव जाऊन बसलाय. कासव हे धनप्राप्ती, धैर्य व शांतीचे प्रतीक असल्याची समजूत असल्यामुळे अनेकांच्या बोटांमध्ये कासवाची अंगठी दिसून येत आहे. नव्हे तर या अंगठीची मागणीही मोठी आहे.

कधी कुठल्या गोष्टीचे फॅड वाढेल, चलन वाढेल हे सांगता येत नाही. वैज्ञानिक युगातही लोकांवर अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा आहे. अनेकांच्या आयुष्यात नैराश्य, नोकरी मिळत नाही, लग्न जुळत नाही, कौटुंबिक वाद या समस्या आहेतच आणि त्या कोणालाही चुकल्या नाहीत. प्रत्येकालाच या विवंचनेतून जावे लागते. जगी सर्व सुखी असा कोण आहे... त्यामुळे या समस्यांतून आपण बाहेर कसे पडू? याचा विचार करीत अनेकजण बुवाबाजीच्या मागे लागतात. देवधर्माचा आधार घेतला जातो. काही महाराज, ज्योतिषी या ग्रहापासून तुम्हाला त्रास होत आहे. त्यासाठी अमुक-अमुक माळ, पंचधातू, खड्याची अंगठी धारण करा, असा सल्ला देतात. गत दोन-तीन वर्षांपासून कासव अंगठीचा बिझनेस चांगलाच फोफावला आहे. कासव हे लक्ष्मीदेवीप्रमाणे धनप्राप्तीचे प्रतीक आहे, अशी अनेकांची समजूत आहे किंवा तसे मनावर बिंबवले जाते. अलीकडे अनेकांच्या हातातील बोटांमध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे सोने, चांदी व तांब्याची कासव अंगठी दिसून येत आहे. वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी चांदीत घालणारे अनेकजण दिसतात. कासवाची अंगठी घातल्याने धनप्राप्ती होते, अशी भाबडी अंधश्रद्धा असल्याने, अनेकजण चांदीची अंगठी घालत आहेत. सराफा दुकानातही अशा विविध आकारातील आकर्षक कासव अंगठ्या उपलब्ध आहेत. कासव हे पवित्र मानले जाते. त्याचाच फायदा घेऊन काही लोक जाणीवपूर्वक अशी अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करीत आहेत. सराफा बाजारातून घेतलेल्या माहितीनुसार एका सराफा दुकानातून दिवसाला सरासरी चार ते पाच कासव अंगठ्यांची विक्री होत आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र अंगठ्या सराफांसह कटलरी, बेन्टेक्स दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. धनप्राप्तीच्या उद्देशाने कासव अंगठी घालणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

अंगठी घालण्यामागचे कारण
वास्तुशास्त्रानुसार कासव अंगठी घातल्याने व्यापारात प्रगती, आत्मविश्वास आणि आरोग्य चांगले राहते. लक्ष्मीची कृपा कायम राहते. पौराणिक कथांनुसार, कासव भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो. कासव धैर्य, शांती, निरंतरता आणि समृद्धीचे प्रतीक आहे, अशी समजूत आहे.

कासवाची अंगठी घालणे निव्वळ अंधश्रद्धा आहे. परंतु व्यवसाय असल्याने, अनेकजण चांदी व सोन्याची कासव अंगठी बनविण्यासाठी येतात. कासवाची अंगठी घातल्याने, धनप्राप्ती होते, अशी मानसिकता असल्याची माहिती सराफा व्यावसायिक संतोष खंडेलवाल यांनी दिली. तर कासवाची अंगठी घालण्याला वैज्ञानिक आधार नसल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. संजय तिडके यांनी सांगितले. अनेकांना असुरक्षित वाटत असल्याने, बुवा, महाराज, ज्योतिषींकडे जातात आणि हे लोक कासव, नाग किंवा राशीचे खड्यांच्या अंगठ्या घालण्याचे सल्ले देतात. या निव्वळ भ्रामक कल्पना आहेत. कोणतीही अंगठी घालून प्रगती होत नाही, तर ती मेहनत, परिश्रमाने होते, असेही तिडके म्हणाले. धार्मिकदृष्ट्या कासवाचे महत्त्व आहे. मनुष्याला इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश कासव देतो. परंतु कासवाची अंगठी घातल्यामुळे कोणतीही धनप्राप्ती किंवा इतर फायदा होत नाही. धातू, ग्रहांच्या रत्नांच्या अंगठ्या घातल्यास त्याचा फायदा होता. ज्याला घालणे आवश्यक आहे, त्यानेच घालाव्यात. इतरांनी विनाकारण घालू नये, असे ज्योतिषाचार्य मोहनशास्त्री जलतारे गुरुजी यांनी सांगितले. 

हलक्या रत्नांचाही धंदा फोफावला!
बोगस ज्योतिषी व भोंदू बाबा या बाबींचा गैरफायदा घेऊन काचेचे तुकडे सोने-चांदीच्या अंगठीत धारण करायला सांगतात. यातही पुष्कराज, माणिक, मोती या रत्नांनाही अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. माणिक ५00 ते १५00 रुपये कॅरेटप्रमाणे रत्नांच्या व्यापारी किंवा नामांकित सुवर्णकाराकडे उपलब्ध असतो. मात्र, ग्लासफील हे कृत्रिम रत्न या भोंदू लोकांकडे असते. त्यालाच माणिक रत्न भासवून अनेक ठिकाणी या कृत्रिम रत्नांची विक्री होत आहे. पुष्कराज, मुखराज रत्नांबाबतही असेच होत आहे. लोकांना पुष्कराजऐवजी बँकॉक पुष्कराज आणि मार्का हे कृत्रिम रत्न दिले जात आहे. हलके रत्न, खड्यांचा धंदा चांगलाच फोफावला आहे.

Web Title: craze of tortoise ring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.