भाजपने विखेंचा नारायण राणे केला; तर विखेंकडे दुर्लक्ष करण्याची काँग्रेसची खेळी

By अतुल कुलकर्णी | Published: April 12, 2019 06:48 PM2019-04-12T18:48:24+5:302019-04-12T18:52:20+5:30

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत:च्या मुलासाठी भाजपचा प्रचार करणे सुरू केल्यामुळे काँग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबले तर भाजपने निवडणूक निकालानंतर विखेंचे काय करायचे ते पाहू असे ठरवले.

Congress's decision to ignore Vikhe-Patil, BJP Make him Narayan Rane | भाजपने विखेंचा नारायण राणे केला; तर विखेंकडे दुर्लक्ष करण्याची काँग्रेसची खेळी

भाजपने विखेंचा नारायण राणे केला; तर विखेंकडे दुर्लक्ष करण्याची काँग्रेसची खेळी

Next

- अतुल कुलकर्णी 

मुंबई  - विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत:च्या मुलासाठी भाजपचा प्रचार करणे सुरू केल्यामुळे काँग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबले तर भाजपने निवडणूक निकालानंतर विखेंचे काय करायचे ते पाहू असे ठरवले. परिणामी भाजपने विखेंचा राणे केला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राणे जरी भाजपच्या तिकीटावर खासदार झाले असले तरी भाजपच्या कोणत्याही नेत्याला राणे आपल्या प्रचाराला यावेत असे वाटत नाही, त्यांचा मुलगा स्वाभिमानी पक्षातर्फे निवडणूक लढवत आहे. त्यामुळे तिकडे राणे मुलाच्या प्रचारात स्वाभिमानी पक्षाच्या व्यासपीठावर जातात तर नगर जिल्ह्यात विखे स्वत:च्या मुलासाठी भाजपच्या व्यासपीठावर जातात. विरोधी पक्ष नेते असणाऱ्या विखेंना काँग्रेसचा एकही उमेदवार प्रचारासाठी बोलवायला तयार नाही. विखे जरी स्टार प्रचारक असले तरी आमच्या मतदारसंघात त्यांची प्रचारसभा लावा अशी एकही मागणी पक्षाकडे आलेली नाही, असे पक्षाच्या कंट्रोलरुम मधून सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेत विखे भाजप मध्ये प्रवेश करणार या बातम्यांना काहीच अर्थ नव्हता कारण लोकसभेचे निकाल काय लागतात, विखेपुत्रास पक्षात घेतल्याचा किती फायदा, तोटा होतो हे पाहूनच विखे यांना पक्षात घ्यायचे की नाही हे ठरवले जाणार असल्याचे भाजपचे नेते सांगतात. त्यातही विखे यांना पक्षात घेतले तर आमचे जिल्ह्यातले स्थान दुय्यम होईल, या भीतीपोटी मंत्री राम शिंदे आणि अन्य नेते अस्वस्थ आहेत. त्यांची अस्वस्थता पक्षाला अडचणीची ठरू शकते हे लक्षात आल्यामुळे देखील विखेंचा भाजप प्रवेश लांबल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. विखेंना काँग्रेसमधून काढून टाकले तर ते हिरो होणार, त्यापेक्षा स्वत:हून ते सोडून गेले तर त्यांचे महत्त्व दुसऱ्या पक्षातही राहणार नाही, शिवाय निकालानंतर विखे यांचे विरोधीपक्ष नेतेपद काढून घेऊन तेथे बाळासाहेब थोरात किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना नेमण्याच्या हालचालीही पक्षात सुरू झाल्या आहेत.

Web Title: Congress's decision to ignore Vikhe-Patil, BJP Make him Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.