ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - राज्य सरकार आर्थिक आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरले असून, खर्च आणि उत्पन्नाच्या बाबतीत कुठलेही नियोजन राहिलेले नाही. एकीकडे जाहिरातीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलवर अधिभार लावून तसेच मुद्रांक शुल्कात वाढ करून सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घालण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. सरकारने इंधनावरील अधिभार आणि मुद्रांक शुल्कात केलेली वाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

मुंबई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खा. अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, जनतेची लूट, विकासकामात तूट, जाहिरातबाजी आणि उधळपट्टीला पूर्ण सूट, असा राज्य सरकारचा कारभार आहे. सरकारला आर्थिक शिस्त राहिली नसून याची शिक्षा राज्यातील जनतेला दिली जात आहे. शिवस्मारक भूमिपूजन कार्यक्रमाच्या जाहिरातीवर 18 कोटी रुपये खर्च केले. आमचा शिवस्मारकाला विरोध नाही, पण जाहिरातीवर एवढा खर्च का? मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मंत्र्यांना कोट्यवधी रुपयांच्या नव्या अालिशान गाड्या खरेदी केल्या जात आहेत. सरकारने यापूर्वी दुष्काळ जाहीर न करता पेट्रोलवर 6 रुपये दुष्काळी सेस लावला आहे, दुष्काळ संपला तरी त्याची वसुली सुरूच आहे. त्यातच गेल्या एप्रिल महिन्यात पेट्रोलवर 3 रुपये प्रति लिटर अधिभार लावण्यात आला होता आणि आता त्यात आणखी 2 रुपयांची भर घालून सरकारने सरसकट एकूण 11 रुपये अधिभार आता पेट्रोलवर लावला आहे. संपूर्ण देशात सगळ्यात महाग पेट्रोल महाराष्ट्रातल्या जनतेला खरेदी करावे लागते आहे. हे कमी होते म्हणून की काय सरकारने शहरी आणि ग्रामीण भागासाठी मालमत्ता हस्तांतरणाकरिता मुद्रांक शुल्क वाढवून आधीच महागाईने पिचलेल्या जनतेला आणखी मोठ्या संकटात टाकले आहे. सरकारने ही अन्यायकारक शुल्क वाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र आंदोलन उभारेल असे खा. चव्हाण म्हणाले.

आमच्या संघर्ष यात्रेनंतर आता सरकार संवाद यात्रा काढणार आहे. सरकारचा शेतक-यांबरोबर संवाद नसल्यानेच संवादयात्रा काढण्याची वेळ आली आहे. या यात्रेत संवाद कोण साधणार तर शेतक-यांना साला म्हणणारे रावसाहेब दानवे, हे अत्यंत हास्यास्पपद आहे असे चव्हाण म्हणाले. या संवाद यात्रेवर टीका करताना खा. अशोक चव्हाण यांनी शेतक-यांबाबत बेताल वक्तव्य करणा-या भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचा पाढा वाचला. शेतक-यांकडे मोबाईल बिल भरायला पैसे आहेत, पण वीजबिल भरायला पैसे नाहीत या भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याची त्यांनी आठवण करून दिली. शेतक-यांमध्ये आत्महत्या करण्याची फॅशन आली आहे.  या भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या आणि शेतक-यांना मरायचे आहे तर मरू द्या या खासदार संजय धोत्रे यांच्या वक्तव्याचा दाखला देत ही भाजपची लोकांशी संवाद साधण्याची पद्धत आहे, असा टोला खा. अशोक चव्हाण यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, छोट्या शहरांना विमानसेवेने जोडण्यासाठी केंद्र सरकारने उड्डाण योजना जाहीर केली, या सेवाचा फायदा राज्यातील फक्त दोन शहरांना होणार आहे, मात्र गुजरातमधील सहा शहरांना या योजनेचा फायदा होणार आहे. ही योजना फक्त गुजरातसाठीच आहे का ? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरकारला केला. राज्यात एकूण 20 विमानतळ तयार आहेत. अपेक्षा होती की इतक्या मोठ्या प्रमाणात विमानतळ उपलब्ध असताना राज्यातील आणखी काही शहरांचा या योजनेत समावेश केला जाईल, अशी अपेक्षा होती परंतु गेल्या अडीच वर्षांच्या भाजप सरकारच्या काळात अनेक प्रकल्प गुजरातला नेले गेले आहेत. त्याच धर्तीवर या योजनेचा लाभ मोदी कृपेने गुजरातला मिळत आहे आहे, असे खा. चव्हाण म्हणाले.

या पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भाजपा सरकारने 400 कोटींचा तूर घोटाळा केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तुरीचे पीक घेतले. पण आता सरकार शेतकऱ्यांची तूर विकत घेत नाही. राज्यात व्यापा-यांनी सुमारे 400 कोटींची तूर खरेदी केंद्रावर शेतक-यांच्या नावाने विकली आहे. सरकारच्या आशीर्वादाने तूर खरेदीत मोठा घोटाळा झाला असून, मुख्यमंत्र्यांचे व्यापाऱ्यांशी लागेबांधे आहेत म्हणून मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत नाहीत, असा आरोप निरुपम यांनी केला. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस विनायकराव देशमुख, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर आणि अल् नासेर झकेरिया उपस्थिते होते.