औरंगाबाद, दि. 13 -औरंगाबाद-पुणे महामार्गावरील गंगापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी संजय चौपाने (५५), रा. ठाणे यांचे निधन झाले. तर नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, काँग्रेसचे माजी ठाणे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर यांच्यासह चार जण जखमी झाले.
औरंगाबाद येथील स्व. इंदिरा गांधी जन्मशताब्दी सोहळा आटोपून हे सर्व जण मुंबईकडे परतत असताना रविवारी सांयकाळी हा अपघात झाला. मोटारसायकलस्वाराला वाचविताना जीप चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने जीप दुभाजकाला धडकून बाजूच्या रस्त्यावरुन औरंगाबादकडे जाणा-या खाजगी बसला धडकली. या अपघातात जीपमधील संजय चौपाने जागीच ठार झाले. तर रमाकांत म्हात्रे, बाळकृष्ण पुर्णेकर, दत्ता म्हात्रे, दलजित बिस्त या जखमी काँग्रेस कार्यकर्त्यांना स्थानिक रहिवासी व पोलिसांनी तातडीने औरंगाबादला हलविले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
मूळ यवतमाळचे रहिवासी असलेले संजय चौपाने हे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते ठाण्यात राहात होते. त्यांच्या अपघाती निधनाची दु:खद वार्ता कळताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, महाराष्टÑ प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह अनेकांना धक्का बसला.