In the 'Combined Defense', the first of the Shruti in Pune, the results of Public Service Commission | ‘कम्बाइन्ड डिफेन्स’मध्ये पुण्याची श्रुती देशात प्रथम, लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर
‘कम्बाइन्ड डिफेन्स’मध्ये पुण्याची श्रुती देशात प्रथम, लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) या परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. लष्करात ब्रिगेडियर असलेल्या विनोद श्रीखंडे यांची श्रुती मुलगी असून, तिने वडिलांचा वारसा पुढे कायम ठेवला आहे.
श्रुती सध्या पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेत आहे. ती ५ वर्षांचा लॉचा कोर्स करीत असून, शेवटच्या ५व्या वर्षाला आहे. गेल्या ७ महिन्यांपासून ती सीडीएस परीक्षेचा अभ्यास करीत होती. लेखी परीक्षा व मुलाखत असे या परीक्षेचे स्वरूप आहे. गुरुवारी रात्री उशिरा यूपीएससीच्या संकेतस्थळावर सीडीएस परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये मराठमोळ्या श्रुतीने देशात अव्वल येत झेंडा रोवला आहे. ती मूळची साताºयाची असून, गेल्या ७ वर्षांपासून पुण्यामध्ये शिक्षण घेत आहे.
देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिला आला आहे, तर व्ही. विक्रम दुसरा व सोहम उपाध्याय तिसरा आला आहे. मुलींमध्ये श्रुतीपाठोपाठ गरिमा यादव दुसरी, तर नोयोनिका बिंदा तिसरी आली. चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) एप्रिल २०१८पासून सीडीएसच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. लष्करातील नॉन टेक्निकल स्वरूपाचे हे प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमता हा तितकाच अधिक महत्त्वाचा भाग असणार आहे. ओटीएची ही १०७ वी तुकडी आहे.

श्रुती सुरुवातीपासूनच टॉपर
सीडीएस परीक्षेत देशात पहिली आलेली श्रुती लोखंडे लॉ कॉलेजच्या परीक्षेतही सुरुवातीपासूनच
टॉपर राहात आल्याचे श्रुतीच्या मैत्रिणी शिल्पा पाटील, देविका द्विवेदी यांनी सांगितले. लॉ, सीडीएस परीक्षेचा अभ्यास करण्याबरोबरच कॉलेजमधील इतर अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये श्रुती सहभागी होत होती, असे त्यांनी सांगितले.

लॉ कॉलेजमध्ये जल्लोष
आयएलएस लॉ कॉलेजची विद्यार्थिनी असलेली श्रुती श्रीखंडे ही सीडीएस परीक्षेत देशात पहिली आल्याचे समजताच तिच्या मैत्रिणींनी लगेच तिच्या घरी धाव घेतली. तिची गळाभेट घेऊन कौतुकाचा वर्षाव केला. आपल्या मैत्रिणीने मिळविलेल्या या यशामुळे त्यांना खूप आनंद झाला होता. श्रुतीसोबत त्यांनीही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मुलाखती दिल्या. दुपारी त्या सगळ्या जणी आयएलएस लॉ कॉलेजमध्ये आल्या. तिथे सगळ्यांनी एकच जल्लोष केला. कॉलेजच्या प्राचार्य वैजयंती जोशी यांच्यासह सर्वच प्राध्यापकांनी श्रुतीचे मन:पूर्वक अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या.

अभ्यासाबरोबरच फिटनेस महत्त्वाचा

डिफेन्समध्ये जायचे असेल तर अभ्य्ाांसाबरोबरच फिजिकल फिटनेस चांगला असणे आवश्यक
आहे. त्यामुळे मी त्याकडेही नेहमी लक्ष दिले.
त्यासाठी दररोज ६ ते ८ आठ किलोमीटर रनिंग करायचे. त्याचबरोबर मैत्रिणींसोबत ट्रेकिंगला
जायचे. लॉ व सीडीएस परीक्षा असा दोन्हीचा
अभ्यास एकाच वेळी करावा लागत होता. त्यासाठी नियमित अभ्यास केला. सीडीएसच्या परीक्षेसाठी बेसिक पक्के करण्यावर भर दिला, असे श्रुती श्रीखंडे हिने सांगितले.

आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा

मी शाळेत असल्यापासून लष्करी सेवेत जाण्याचे स्वप्न बाळगले होते, ते आता प्रत्यक्षात उतरले आहे. यूपीएससीकडून घेतल्या जाणाºया या परीक्षेला विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे. विशेषत: मुलाखतीच्या वेळी तुमचा अधिक कस लागतो, असे श्रुती श्रीखंडे हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सीडीएसच्या मुलाखतीमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. त्याची तुम्ही कशी उत्तरे देता, किती वेळात त्याला प्रतिसाद देता याकडे बारकाईने लक्ष दिले जाते. मी लॉचा अभ्यास करतानाच गेल्या ७ महिन्यांपासून सीडीएस परीक्षेचाही अभ्यास केला. अभ्यासाबरोबरच इतर वाचन, चित्रपट पाहणे आदी छंदही जोपासले. परीक्षेचा फार ताण न घेता आत्मविश्वासाने याला सामोरे गेल्यास निश्चितच यश मिळते, असा विश्वास श्रुतीने व्यक्त केला. लष्करात असलेले वडील, आई तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन व पाठिंबा यामुळेच हे यश मिळू शकल्याची भावना तिने व्यक्त केली.

 मुलींसाठी डिफेन्स हे चांगले करिअर
श्रुतीने डिफेन्समध्ये यावे अशी माझी इच्छ होती, मात्र त्याबाबतचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मी तिला दिले होते. तिने सीडीएसच्या परीक्षेत देशात प्रथम येऊन मिळविलेल्या यशाबद्दल मला गर्व वाटतो. मुलींसाठी डिफेन्सची सेवा खुली करण्याचा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. निश्चितच डिफेन्स हे मुलींसाठी चांगले करिअर ठरू शकेल.
- विनोद श्रीखंडे, ब्रिगेडिअर
(श्रुतीचे वडील)
 


Web Title:  In the 'Combined Defense', the first of the Shruti in Pune, the results of Public Service Commission
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.