विशेष लेख - भाजपा-शिवसेनेचा बिनपैशाचा तमाशा

By संदीप प्रधान | Published: June 6, 2018 06:50 AM2018-06-06T06:50:59+5:302018-06-06T10:46:50+5:30

दोन माणसं एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ करीत असतील किंवा झोंबाझोंबी करीत असतील तर आपण त्याला ‘तमाशा’ सुरु आहे, असे म्हणतो. काही वेळा उतरल्यावर पुन्हा हेच झोंबाझोंबी करणारे गळ्यात गळे घालून फिरताना दिसतात.

clashes between BJP & Shivsena | विशेष लेख - भाजपा-शिवसेनेचा बिनपैशाचा तमाशा

विशेष लेख - भाजपा-शिवसेनेचा बिनपैशाचा तमाशा

googlenewsNext

दोन माणसं एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ करीत असतील किंवा झोंबाझोंबी करीत असतील तर आपण त्याला ‘तमाशा’ सुरु आहे, असे म्हणतो. काही वेळा उतरल्यावर पुन्हा हेच झोंबाझोंबी करणारे गळ्यात गळे घालून फिरताना दिसतात. तेव्हा सुरुवातीला लोकांना आश्चर्य वाटते. मात्र नेहमीचेच झाले की, लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांचे गेले चार वर्षे जे काही सुरु आहे त्याचे वर्णन ‘तमाशा’ या सदरात मोडते. सत्तेचा डोस अंमळ जास्त झाल्याने सुरुवातीला भाजपाच्या मंडळींनी शिवसेनेला डिवचले आणि मग राडेबाजीकरिता कुप्रसिद्ध असलेल्या शिवसेनेनी भाजपाच्या कॉलरला हात घातला. या दोन्ही पक्षांचे हे जे तमाशे सुरु आहेत ते वरवर दाखवायचे दात आहेत. आतून हे दोन्ही पक्ष किंवा या दोन्ही पक्षातील काही मंडळी यांचे गुळपीठ आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेनी उमेदवार उभा करुन भाजपाला अपशकुन करण्याचा प्रयत्न केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बरीच खडाखडी झाली. शाब्दीक वार केले गेले. मात्र २०१४ मध्ये सत्ता आल्यानंतर लागलीच झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीतही हेच घडले होते. वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा फडणवीस यांनी केली होती तर भाजपाच्या पॅकेजवर शिवसेना तुटून पडली होती. त्यामुळे त्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे वगैरे पक्ष अदखलपात्र झाले होते. त्याचा परिणाम असा झाला की, शिवसेनेची सत्ता आली व भाजपाच्या जागा पाचपट वाढल्या. पालघरमध्ये त्याचीच पुनरावृत्ती झाली. भाजपा विजयी होऊन त्यांनी आपली जागा राखली.

मात्र यापूर्वी कधीही या मतदारसंघात निवडणूक न लढणाऱ्या शिवसेनेनी लक्षणिय मते घेतली. थोडक्यात काय तर भाजपा-शिवसेनेच्या तमाशांना अजूनही ‘टीआरपी’ आहे. जेव्हा हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या कॉलर पकडून एकमेकांना लोळवतात तेव्हा लोकांची करमणूक होते. लोकांचे लक्ष त्यांच्याकडे लागते. परिणामी काँग्रेस पाचव्या क्रमांकावर फेकली जाते. कल्याण-डोंबिवलीपासून अनेक निवडणुकीत हाच खेळ हे दोन्ही पक्ष करीत आहेत. पालघरचा निकाल लागल्यावर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार, अशा फुसकुल्या भाजपाच्या मंडळींनीच माध्यमांकडे सोडल्या. पालघरमध्ये शिवसेनेनी भाजपाला धूळ चारली असती तर भाजपाला स्वत:हून शिवसेनेला घरचा रस्ता दाखवावा लागला असता. मात्र ही नुरा कुस्ती असल्याने भाजपावर तशी वेळ आली नाही. आता तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवर पायधूळ झाडण्यास तयार झाले आहेत. २०१४ मध्ये हेच शहा उद्धव ठाकरे यांना हिंग लावून विचारायला तयार नव्हते. नरेंद्र मोदी यांचा करिष्मा कायम असला तरी त्याला उतरती कळा लागली आहे व विरोधक एकवटले तर फटका बसतो हे गेल्या काही निवडणूक निकालावरुन भाजपाला जाणवले आहे. त्यामुळे शहा यांचा ताठ कणा लवचिक झाला आहे.

पालघरच्या प्रचारात फडणवीस यांची साम, दाम, दंड व भेदाबाबत वक्तव्य करणारी एक सीडी वाजली. त्यावरुन बरीच बोलाचाली झाली. मात्र त्या साम, दामाचा अर्थ गेल्या चार वर्षांतील या पक्षांच्या परस्पर व्यवहारांकडे नीट पाहिल्यास कळतो. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकरिता महापौर बंगलाच हवा, असा आग्रह शिवसेनेनी धरल्यानंतर ही ऐतिहासीक वास्तू (किंमत सुमारे ४ हजार कोटी) स्मारकाकरिता देण्याची तयारी सरकारने दाखवली व तसे आदेश जारी केले. महापौर बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या हिरवळीवर ठाकरे जवळपास दररोज फिरायला येतात. त्यांना ती वास्तू आवडते. एकदा का ही वास्तू स्मारकाकरिता दिली गेली की, त्याचा ताबा महापालिका प्रशासनाकडून शिवसेनेकडे जाणार हे उघड आहे. हा फडणवीस यांनी शिवसेनेबाबत स्वीकारलेला ‘साम’ मार्ग नव्हे काय? उद्धव ठाकरे व पत्नी रश्मी ठाकरे यांच्या स्वप्नातील मातोश्री-दोनची उभारणी वादात सापडली होती. टीडीआर घेऊन नऊ मजल्यांची इमारत उभी करण्याचा इरादा होता. मात्र रस्त्यालगत उभ्या राहणा-या या बांधकामाकरिता टीडीआर वापरताना रस्त्याची रुंदी व इमारतीची उंची यासंदर्भातील नियमांनी अडसर निर्माण केला होता. त्यामुळे महापालिकेत सत्ता असूनही ठाकरे यांच्या घराचे आराखडे मंजूर होत नव्हते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडील नगरविकास विभागाने चुटकीसरशी हा अडसर दूर करुन शिवसेनेला आपल्या ‘साम’ (सामोपचार) मार्गाचे दर्शन घडवले होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर किरीट सोमैया यांनी महापालिकेत ‘माफियाराज’ सुरु असल्याचे व रस्त्यांच्या कंत्राटापासून अनेक कंत्राटात झोल असल्याचे आरोप केले होते. मागील पावसाळ््यात मलिष्काच्या व्हीडिओने वादळ उठले होते. या सर्व घोटाळ््यांची चौकशी करण्याची मागणी सोमैया यांनी केली होती. मात्र निवडणुकीनंतर सोमैया यांची दातखीळ बसली की त्यांनी त्रिदंडी राजसंन्यास घेतला ते कळले नाही.

मात्र महापालिकेच्या कारभाराची चौकशी झालेली नाही. अर्थात महापालिकेचा कारभार पारदर्शक झाला असेही नाही. महापालिकेची कंत्राटे देण्यातील भ्रष्टाचार थांबला, असेही नाही. त्यामुळे महापालिकेतील ‘दाम’ ज्या खिशात जात होते ते जाणे सुरुच राहिले. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपाने जिंकलेल्या जागांमधील अंतर हाताच्या बोटावर मोजण्याइतपत होते. मनसे फोडून शिवसेनेनी संख्याबळ वाढवले. राज्यातील सत्तेचा वापर करुन मुंबई महापालिकेवर कब्जा करणे भाजपाला अशक्य नव्हते. मात्र शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेत आहे. त्यामुळे त्यांना तेथून सत्तेबाहेर काढले तर ते राज्यातील सत्तेत क्षणभर राहणार नाहीत, याची भाजपाला कल्पना होती. भाजपाच्या ‘दाम’ मार्गाचेच हे नमूने असावे. शिवसेनेतील काही हुकमी एक्के निवडणुकीच्या तोंडावर भाजपात घेऊन दंडित करण्याची म्हणजे ‘दंड’ मार्गाची चुणूक दाखवण्याची संधी आहेच. मात्र लोकसभा निवडणुकीपर्यंत शिवसेनेला ‘साम’, ‘दाम’ दाखवून चुचकारणे ही सध्या भाजपाची गरज आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपाच्या बाजूने लागल्यावर कदाचित अमित शहा यांचा लवचिक कणा पुन्हा ताठ होऊ शकतो.

मुंबईत विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १५ तर शिवसेनेचे १४ आमदार निवडून आले हीच बाब शिवसेनेला डाचत आहे. लोकसभा निवडणूक ही भाजपाकरिता महत्त्वाची आहे तर शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत जास्त रस आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने भाजपा पाळेल, यावर शिवसेनेचा अजिबात विश्वास नाही. त्यामुळे या दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचा आग्रह शिवसेना धरु शकते. त्याचबरोबर मुंबईतील आणि ग्रामीण भागातील काही जागावाटपात उजवे माप मिळण्याची अट शिवसेना घालू शकते. भाजपाला शिवसेनेची गरज असेल तर या अटी-शर्ती मान्य करुन तडजोड होईल. मात्र शिवसेनेखेरीज सत्ता शक्य आहे हे भाजपाला दिसले तर मग पुन्हा दोघांमधील तमाशे सुरु होतील आणि दररोजची बिनपैशांची करमणूक सुरु राहील.

Web Title: clashes between BJP & Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.