औरंगाबाद, दि. १३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. ते इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी औरंगाबादला आले होते. यावेळी पत्रकारांशी खा. चव्हाण यांनी वार्तालाप केला. 

खा. चव्हाण यांनी सांगितले की, सुभाष देसाई  आणि प्रकाश मेहता या दोघांचाही राजीनाम मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नाही. यामागे सरकार असुरक्षित होईल, ही भिती दिसून येते. सुभाष देसाई यांचा राजीनामा स्वीकारल्यास शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेईल, असेही त्यांना वाटले असावे. पण एकनाथ खडसे यांना एक न्याय आणि  मेहता- देसाई यांना एक न्याय हे यातून दिसून येते. 

लोकायुक्तांना मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्याचा अधिकार नाही. प्रकाश मेहता यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी होणार आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन नस्तीवर सही केल्याचे म्हटले आहे, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. नारायण राणे यांच्या संबंधाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे अशोक चव्हाण यांनी टाळले. ते भाजपमध्ये कधी जाणार हे त्यांनाच विचारा असे ते म्हणाले. 

पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता सरकारने राज्यात टंचाईसदृष्य परिस्थिती जाहीर करावी व त्वरित उपाययोजना सुरु कराव्यात अशी मागणी चव्हाण यांनी केली. त्यांनी सांगितले की, पावसाची खूप गरज आहे. जायकवाडीतही जेमतेम पाणी आले आहे. तीन महिन्यांपासून पावसाने ओढच दिली आहे. त्यामुळे पिके उद्ध्वस्त होत आहेत. सरकारने वेळीच उपाययोजना सुरु करण्याची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले.