ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 17 : देशपातळीवरील नीट आणि जेईई या प्रवेश परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता अकरावी व बारावीच्या विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल केला आहे. त्यानुसार आता पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकाला महत्व प्राप्त झाले आहे. प्रश्नांचे बहुपर्याय बंद करण्यात आले असून एका प्रश्नाला त्याच घटकातील प्रश्नाचा पर्याय राहणार आहे. त्यामुळे शिक्षकांना अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक शिकवावा लागणार असून घोकंपट्टीलाही मर्यादा येणार आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना नीट व जेईई या परीक्षांना सामोरे जाताना खुप अडचणी येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून सतत केल्या जात होत्या. मंडळाचा अभ्यासक्रम तसेच प्रश्नपत्रिकांचे स्वरूप योग्य नसल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार मंडळाकडून अभ्यासक्रमात बदल करण्यापासून प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलण्याबाबत सातत्याने चाचपणी करण्यात आली. त्यातच कौन्सिल आॅफ बोर्ड्स आॅफ स्कुल एज्युकेशन इन इंडियाने (कॉब्से) देशातील इयत्ता अकरावी व बारावी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र या चार विषयांच्या परीक्षांचे देशपातळीवर एकाच पध्दतीचे आराखडे तयार केले होते. त्याप्रमाणे राज्य मंडळाने नीट व जेईई परीक्षा तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून या चार विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे नवीन आराखडे तयार केले आहेत. राज्य शासनाकडूनही या आराखड्यांना मान्यता मिळाली असून चालु शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावीसाठी त्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. तर इयत्ता बारावीची फेब्रुवारी २०१९ मधील परीक्षा सुधारीत आराखड्यानुसार असेल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
चारही विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदलताना प्रचलित अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयाच्या १०० गुणांपैकी लेखी परीक्षा ७०, तर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी ३० गुण असतील. गणित आणि संख्याशास्त्र विषयासाठी ८० गुणांची लेखी, तर २० गुण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असतील. लेखी परीक्षेसाठी प्रत्येकी एकच प्रश्नपत्रिका व एकच उत्तरपत्रिका राहील. या परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर राहतील. प्रात्यक्षिक परीक्षांच्या आराखड्यातही बदल करण्यात आलेला नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

प्रश्नपत्रिकांमध्ये बदल करताना प्रामुख्याने नीट, जेईई तसेच देशपातळीवरील इतर प्रवेश परीक्षांचा विचार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना काही अडचणी येत होत्या. सुधारीत प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यामुळे या परीक्षांना सामोरे जाताना अडचणी येणार नाहीत. पुर्वी प्रश्नपत्रिकांमध्ये चार-पाच प्रश्न देवून त्यातील दोन-तीन प्रश्न सोडविण्यास सांगितले जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त पर्याय मिळत होते. आता त्यात बदल करण्यात आला आहे. सुधारीत आराखड्यामध्ये एका प्रश्नाला एकच पर्यायी प्रश्न असेल. हे प्रश्नही पाठ्यपुस्तकातील एकाच घटकाशी संंबंधित असणार आहे. तसेच काठिण्यपातळीही नीट व जेईई प्रमाणे ठरविण्यात आली आहे. यामुळे शिक्षकांना आता अभ्यासक्रमातील कोणताही घटक बाजुला ठेवता येणार नाही. प्रत्येक घटक शिकवावाच लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही केवळ पाठांतर करून भागणार नाही, असे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.