कर्नाटकचे गोडवे गाणाऱ्या महसूल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 10:30 AM2018-01-22T10:30:09+5:302018-01-22T10:31:48+5:30

बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गायल्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वस्तरातून टीका होते आहे. 

chandrakant patil sings kannad song, ajit pawar demands resignation | कर्नाटकचे गोडवे गाणाऱ्या महसूल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा- अजित पवार

कर्नाटकचे गोडवे गाणाऱ्या महसूल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा- अजित पवार

Next

नांदेड- बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गायल्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वस्तरातून टीका होते आहे. ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच’ हे कन्नड अभिमान गीत गायल्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर सोशल मीडियाबरोबरचं राजकीय नेत्यांकडूनही टीका होऊ लागली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. तसंच त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. 



 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टि्वट करून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. 'कर्नाटकात मराठी भाषिकांना वाईट वागणूक मिळते. हे माहीत असतानाही पाटील यांनी बेळगावातील एका कार्यक्रमात कन्नड गीत गाणं अयोग्य आहे. त्यांच्या वागण्याचा धिक्कार असून त्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा,' अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. 'आपल्या मंत्र्याने परराज्यात जरूर जावे, पण स्वतःच्या राज्याची अस्मिता पाळावी,' असा टोलाही पवार यांनी लगावला. 

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही टीका केली आहे. 'चंद्रकांत पाटलांनी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला,' अशी टीका धनंजय मुंडेंनी केली. 'महाराष्ट्र भाजपाचे गुजराती प्रेम ज्ञात होते, आता कन्नड प्रेमही उघड झालं आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या पाटलांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी,' अशी मागणी विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. 



 

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
सीमाभागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषकांवर होणा-या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत असताना सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्रीपद सांभाळणा-या चंद्रकांत पाटील यांनी ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच’ हे कन्नड अभिमान गीत गायल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. बेळगावजवळील गोकाक तालुक्यातील तवग येथे शुक्रवारी सायंकाळी पाटील यांच्या हस्ते दुर्गादेवी मंदीर जीर्णोद्धाराचा शुभारंभ झाला. चंद्रकांतदादांनी कन्नडमधून ‘जन्मावे तर कर्नाटकमध्येच जन्मावे’(हुट्टी दरे कन्नड नल्ली हुट्ट बेकू) हे दक्षिणात्य अभिनेता राजकुमार यांचे गीत गायलं.

ते म्हणाले, गेली ६१ वर्षे बेळगावात सीमावाद असला तरी कन्नड, मराठी भाषक एकदिलाने राहत आहेत, अशात भाषाभेद कसला करता? सीमावाद असला तरी एकीने, सौहार्दाने राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
 

Web Title: chandrakant patil sings kannad song, ajit pawar demands resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.