चाळीसगाव : विष प्राशन करीत  आत्महत्येच्या प्रयत्न करणारे चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी  शनिवारी दिलेल्या जबाबानुसार ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव निकम, सभापती स्मितल दिनेश बोरसे, त्यांचे पती दिनेश पुरुषोत्तम बोरसे, उपसभापती संजय भास्कर पाटील,  पं.स. सदस्य कैलास चिंतामण पाटील, सुनिल साहेबराव पाटील यांच्यासह कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी के.व्ही. मालाजंगम, सहाय्यक परिक्षेत्र अधिकारी आर.डी. महिरे अशा आठ जणांविरुद्ध कलम ५०६, ३४ अनुसुची जाती - जमाती प्रतिबंधक कायदा ३ (एमआर) प्रमाणे शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून डीवायएसपी अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नि. राजेश घोळवे पुढील तपास करीत आहे.
चौकशी समिती आज घेणार उलट तपासणी 
प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय समितीने शनिवार पासून पंचायत समितीतील ३६ कर्मचा-यांची चौकशी सुरु केली असून रविवारी दुपार पासून उलट तपासणी होणार आहे. समितीचे अध्यक्ष उपायुक्त सुखदेव बनकर हे आज येणार आहे. शनिवारी ते उपस्थित नव्हाते. 
पं.स.च्या अस्थापनेवर एकुण ७६ कर्मचारी आहेत. मात्र गुरुवारी झालेल्या मासिक सभेच्या दिवशी ३६ कर्मचारी हजर होते. याच कर्मचा-यांची चौकशी होणार असून बीडीओ वाघ यांनी गुरुवारीच दुपारी दोन वाजता आपल्या केबिनमध्ये विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. बीडीओ वाघ यांनी लिहिलेली पाच पानी सुसाईटनोटही पोलिसांनी जप्त केली आहे. या नोट मध्ये त्यांनी पं.स.च्या काही कर्मचा-यांचीही नावे नोंदवली आहेत. 
कर्मचा-यांनी सादर केले लेखी जबाब 
शनिवारी समितीच्या सहा सदस्यांसमोर एकुण ३६ कर्म-यांनी स्वहस्तक्षरात लिहिलेले लेखी जबाब सादर केले आहे. यावरच रविवारी सुखदेव बनकर यांच्या उपस्थितीत उलट तपासणी होणार आहे. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच पं.स.मध्ये वर्दळ दिसून आली. पं.स.च्या दोन मासिक सभांचे इतिवृत्तही तपासले जाणार आहे. 
उपायुक्त अध्यक्षतेखालील समितीची चौकशी 
नाशिक विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त सुखदेव बनकर यांच्या अध्यक्षतेखाली विक्रांत बागडे ( प्रकल्प संचालक, जळगाव),  प्रमोद पवार (जिल्हा ग्रामीण विकास, नाशिक), राजेश देशमुख (तपासणी आयुक्तालय, नाशिक), चंद्रकांत वानखेडे (सहाय्यक संचालक, नाशिक), शरद पवार (सहाय्यक प्रशासन अधिकारी, नाशिक), प्रदीप पवार (अव्वल कारकुन, आयुक्तालय, नाशिक) यांचा समिती मध्ये  समावेश आहे.