सिंधुदुर्ग, दि. 13 - कणकवली शहरासह तालुक्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. दुपारी दोन वाजल्यापासून ढगांचा जोरदार गडगडाट सुरू होता. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत पावसाने हजेरी लावली नव्हती. तर मंगळवारी रात्री जोरदार कोसळलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. काही सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावे लागले.

गेले काही दिवस दुपारी दोन वाजण्याचा मुहूर्त धरून कणकवली तालुक्यात पाऊस कोसळत आहे. मंगळवारीही असाच पाऊस झाला होता. सायंकाळी उघडीप दिलेल्या पावसाने रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. शहरातील मसुरकर किनई परिसरात उच्च विद्युत दाबामुळे काही लोकांच्या घरातील टीव्ही तसेच पंखे जळण्याची घटना घडली.

कणकवली शहरातील ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेने 21 दिवसांच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंगळवारी रात्री बुवा अभिषेक शिरसाट व बुवा संदीप पूजारे यांचा डबलबारी भजनाचा सामना आयोजित केला होता. मात्र, भजनाला सुरुवात होताच पावसाने जोर धरला. दोन तासांहून अधिक काळ हा पाऊस पडत होता. अचानक आलेल्या या पावसाने भजन रसिकांची तारांबळ उडवली. काही रसिकानी महामार्गा शेजारील दुकानांचा पावसापासून वाचण्यासाठी आधार घेतला. तर काही रसिकांनी जाग्यावरच उभे रहात प्लास्टिकच्या खुर्च्या डोक्यावर घेवून पावसा पासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. दोन तासाहून अधिक काळ पाऊस पड़त असल्याने शेवटी हा डबलबारी भजनाचा सामना रद्द करण्यात आला. बुवा अभिषेक शिरसाट यांनी परमहंस भालचंद्र महाराजावरील मालवणी भाषेतील गजर यावेळी सादर करून या कार्यक्रमाची सांगता केली. मंगळवारी रात्री जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस कोसळला . बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या 24 तासांतील पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

दोडामार्ग ८मिमी. (२७३५), सावंतवाडी १३ (३१२१.३), वेंगुर्ला ३.८ (२२०८.७), कुडाळ २७ (२४९७), मालवण ११ (१९०१.४), कणकवली ४२ (३१९८), देवगड ५८ (१९७३), वैभववाडी २०मिमी (२८९६मिमी) असा पाऊस झाला आहे.