'' मराठा'' जातीचे भांडवल करणारे पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 07:00 AM2019-05-30T07:00:00+5:302019-05-30T07:00:05+5:30

मराठा क्रांती आणि संभाजी ब्रिगेडच्या तेरा उमेदवारांना मिळालेली एकूण मते जेमतेम २१ हजार ७४२ आहेत.

The canditates lost in loksabha election 2019 who use capital of "Maratha" caste | '' मराठा'' जातीचे भांडवल करणारे पराभूत

'' मराठा'' जातीचे भांडवल करणारे पराभूत

Next
ठळक मुद्दे‘मराठा’ म्हणून मते मागणाऱ्यांना मराठा समाजाने नाकारलेनाशिक, बीड, हातकणंगले, औरगांबाद या चार लोकसभा मतदारसंघात तर ‘मराठा’ म्हणून प्रचार

सुकृत करंदीकर
पुणे : कमालीच्या संवेदनशील ठरलेल्या कोपर्डी प्रकरणानंतर राज्यात ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चे निघाले. या मोर्चांना लाखोंच्या संख्येने उत्स्फूर्त गर्दी झाली. यामुळे मराठा जात संघटीत झाल्याचे चित्र निर्माण झाले. त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झाला.  मात्र मराठा जातीचा उपयोग राजकारणासाठी करु पाहणाऱ्यांना मराठा समाजाने सपशेल नाकारले असल्याचे स्पष्ट झाले आहे.मराठा क्रांती आणि संभाजी ब्रिगेडच्या तेरा उमेदवारांना मिळालेली एकूण मते जेमतेम २१ हजार ७४२ आहेत.
नाशिक, बीड, हातकणंगले, औरगांबाद या चार लोकसभा मतदारसंघात तर ‘मराठा’ म्हणून मोठ्या प्रमाणात प्रचार झाल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात यापैकी नाशिक आणि हातकणंगले मतदारसंघात मराठी जातीचे उमेदवार निवडून आले. बीड आणि औरंगाबादेत मराठा उमेदवार पराभूत झाले. शिरुर (जि. पुणे) लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव-पाटील विरुद्ध अमोल कोल्हे  असा सामना झाला. या लढतीत प्रारंभी मराठा विरुद्ध माळी असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र येथेही कोल्हे यांनी ‘शिवरायांचा मावळा हीच माझी जात’ असे सांगून जातीय ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न केला. दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कोल्हे यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी व संभाजी राजांच्या भूमिकांचा प्रभाव प्रचंड होता. त्यामुळे  कोल्हे यांच्याविरुद्धच्या लढतीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न मतदारांनी निष्फळ ठरवला.
या चार मतदारसंघांशिवाय राज्यातल्या तेरा लोकसभा मतदारसंघांमधून संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्रीय महासंघ, शिवप्रहार संघटना आदी मराठा जातीशी संबंधित संघटनांचे कार्यकर्ते-पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र या तेराही उमेदवारांना ‘मराठा’ म्हणून मतदान झाल्याचे दिसून आलेले नाही. मराठा उमेदवार विरुद्ध मराठा उमेदवार अशा पंधरा लढती राज्यात झाल्या. यातल्या बहुतांश ठिकाणी विजयी झालेले मराठा उमेदवार हे प्रस्थापित किंवा राजकीय पार्श्वभूमी असलेलेच आहेत. महाराष्ट्र क्रांती सेना नावाचा पक्ष काढलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सुरेशदादा पाटील यांचा पक्ष तेरा जागा लढवणार होता. मराठा आरक्षणाबाबत घेतलेला शासन निर्णय निवडणुकीच्या तोंडावर जाहीरपणे फाडून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. प्रत्यक्षात मात्र हे  पाटील निवडणूक न लढवता भाजपाच्या गोटात सहभागी झाल्याचेही दिसून आले.         
.............
बहुजनांनी बांधली मतांची मोट
अभूतपूर्व ठरलेल्या मराठा क्रांती मोर्चांच्या पार्श्वभूमीवर राज्यात दलित आणि ओबीसींचेही महामोर्चे काढण्यात आले. यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली बहुजन वंचित आघाडी स्थापन झाली. या आघाडीच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी एक लाखापासून कमाल साडेतीन लाखांपर्यंतची मते मिळवली. बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या भरघोस मतांमुळे काँग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडीच्या आठ उमेदवारांना थेट फटका बसला. अशीच कामगिरी मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना करता आली नाही. मराठा क्रांती मोर्चाला कोणतेही नेतृत्त्व नव्हते. निर्नायकी असलेल्या लाखोंच्या मोर्चांमधून कोणतेही नेतृत्त्व उभे राहू शकले नाही. 
...........

प्रस्थापित मराठ्यांची सलगी सत्तेशी
कोल्हापुरचे छत्रपती संभाजीराजे, नारायण राणे (सिंधुदूर्ग), विजयसिंह  मोहिते-पाटील (अकलूज), राधाकृष्ण विखे-पाटील (नगर), रणजितसिंह नाईक-निंबाळकर (सातारा), नरेंद्र पाटील (सातारा), अतुल भोसले (कराड) आदी राज्यातली अनेक प्रस्थापित राजकीय घराणी भाजपमध्ये सहभागी झाली. त्याचवेळी मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेल्या तसेच या मोर्चांमध्ये निर्णायक स्थान असलेल्या अनेक जबाबदार नेत्यांनी मात्र राजकीय भूमिका घेण्याचे टाळत लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहणे पसंत केले. या जाणत्या मंडळींनी त्यांच्या तटस्थतेबद्दलचे संदेशही जाणीवपूर्वक सोशल मीडियातून प्रसृत केले. 

मतदारसंघ                    उमेदवार (संबंधित संघटना)                                                      मिळालेली मते
उस्मानाबाद                   नेताजी गोरे (माजी प्रदेशाध्यक्ष, मराठा सेवा संघ)                              ६,६७२
सोलापूर                     श्रीमंत म्हस्के (संभाजी ब्रिगेड)                                                             २,०१५
शिरुर                         शिवाजी पवार (संभाजी ब्रिगेड)                                                              ६७० 
जालना                       शाम शिरसाठ (संभाजी ब्रिगेड)                                                            ११४६
माढा                          विश्वंभर काशिद  (माजी पदाधिकारी, मराठा सेवा संघ)                       ११५६
                                संदीप पोळ (समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा)                                         १५१७
मुंबई उत्तर                   अमोल जाधवराव (संभाजी ब्रिगेड)                                                   ८९७
औरंगाबाद                   अंकुश पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी)                                                   ३८७
नगर                          संजीव भोर (शिवप्रहार संघटना)                                                        ३७९३
ठाणे                          विठ्ठल चव्हाण (संभाजी ब्रिगेड)                                                           ५३४
                                  विनोद पोखरकर (समन्वयक, मराठी क्रांती मोर्चा)                              ७६६
मुंबई ईशान्य                 स्नेहा कुºहाडे (मराठी क्रांती मोर्चा)                                               १२७६   

Web Title: The canditates lost in loksabha election 2019 who use capital of "Maratha" caste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.