B.Sc students get a Bachelor of Science degree in paper, Bhakada-based Sakoli MB. Types of Patel College | बीएससीच्या विद्यार्थ्यांना बीए अभ्यासक्रमाचा पेपर, भंडा-यातील साकोली एम.बी. पटेल महाविद्यालयातील प्रकार

संजय साठवणे

साकोली (भंडारा) : मनोहरभाई पटेल महाविद्यालयात गुरूवारला बीएसस्सी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना चक्क बी.ए. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा पेपर देण्यात आला. पेपर दिल्यानंतर एक तासानंतर ही बाब लक्षात येताच पुन्हा बीएससीचा पेपर देऊन विद्यार्थ्यांना एक तासाची अधिकची वेळ देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी चकित झाले.

स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्षाचा गणिताचा पेपर होता. दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांना बीएससी गणित ऐवजी बी.ए. प्रथम वर्षाचा गणिताचा पेपर देण्यात आला. विद्यार्थीही पेपर सोडविण्यात मग्न असले तरी विद्यार्थ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र वेळेचे भान ठेवता विद्यार्थ्यांनी जमेल तसे पेपर सोडवायला सुरूवात केली. 

या दरम्यान विद्यार्थ्यामध्ये कुजबुज सुरू होती. एक तासानंतर परीक्षाप्रमुख व प्राचार्याच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तात्काळ नागपूर विद्यापिठाशी संपर्क साधला. विद्यापिठाशी संपर्क साधून झाल्यानंतर व विद्यापिठाशी परवानगी घेतल्यानंतर बीएससीचा पेपर देण्यात आला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना २ ते ५ ऐवजी आता २ ते ६ पर्यंत वेळ वाढवून देण्यात आली होती. 

परीक्षे दरम्यान झालेला संपूर्ण घोळ परीक्षाप्रमुख व प्राचार्याच्या चुकीमुळे घडला, असा आरोप परिक्षा देणाºया विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

बीएसस्सीच्या विद्यार्थ्यांना बी.ए.चा पेपर देण्यात आल्याची चूक लक्षात येताच त्यांना तात्काळ पेपर बदलवून दिला. तसाही बी.ए. व बीएसस्सीचा सिलॅबस सारखाच असतो.

-डॉ. एच.आर. त्रिवेदी, प्राचार्य एम.बी.पटेल महाविद्यालय साकोली.