ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. 29 - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नोटाबंदी निर्णयावरुन पुन्हा एकदा टीका केली आहे. नोटाबंदी निर्णयामुळे काळा पैसाधारक चांगले झोपले आहेत, गरीब बँकांच्या रांगेत उभे आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदी निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे.  
 
जिल्हा सहकारी बँकेच्या अद्ययावत यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.  'नोटाबंदीमुळे शेतकरी, सहकार क्षेत्र अडचणीत सापडलाय. अनेक उद्योगांनी कामगार कपात सुरू केली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर कायदा सुव्यवस्था बिघडून देशाचे अंतर्गत स्थैर्य धोक्यात येईल', असेही शरद पवार यांनी यावेळी म्हटले.
मोदींनी ऑपरेशन चांगले केले पण नंतरची काळजी न घेतल्यास पेशंट दगावेल, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. दरम्यान, 'काळा पैसा बाहेर काढणे चूक नाही. मात्र निवडणुकीपूर्वी परदेशातील काळा पैसा जनतेच्या खात्यात टाकणार, असे मोदी म्हणाले होते. मोदी स्वित्झर्लंडला गेले, पण तिथून मोकळ्या हाती परतले', असा टोलाही शरद पवार यांनी मोदींना हाणला.