लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरविताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) सर्व घटक पक्षांना विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्याने भाजपाच्या उमेदवारास समर्थन देण्याची तयारी शिवसेनेने दर्शविली. तसेच, दोन्ही बाजूंचे मतभेद संपवून सरकारमध्ये एकदिलाने काम करण्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सहमती दर्शविल्याचे समजते.
राष्ट्रपतिपदाची निवडणूक आणि भाजपा-शिवसेनेत ताणल्या गेलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेदेखील या बैठकीला उपस्थित होते. सुमारे सव्वा तास चाललेल्या या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीसह अन्य विषयांवर चर्चा झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) राहण्याचे शिवसेनेने मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेने यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि कृषीतज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांची नावे सुचवली होती. पण, भाजपाकडून एखादे चांगले नाव आल्यास त्याचाही विचार करू, असे स्वत: उद्धव यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत भाजपाच्या संसदीय बोर्डाची बैठक व्हायची आहे. त्यात आम्ही उमेदवार निश्चित करू. मात्र, हा उमेदवार ठरवताना सर्व घटक पक्षांना विश्वासात घेण्यात येईल, असे अमित शहा यांनी सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमचा उमेदवार ठरवा, आम्हाला कळवा, आमचे त्याला समर्थन असेल. या निवडणुकीत ‘एनडीए’सोबत राहण्याचे शिवसेनेने मान्य केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दोन्ही पक्षांत आलेली कटुता, त्यातून एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप यासंदर्भातसुद्धा यावेळी चर्चा झाली. दोन्ही बाजूचे मतभेद संपवून सरकारमध्ये एकदिलाने काम करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवल्याचे समजते.


अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेदेखील ‘मातोश्री’वर गेले होते. मात्र, दानवे यांना बैठकीत स्थान देण्यात आले
नसल्याचे समजते.
भाजपाकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले असून धोरणात्मक बैठकीत दानवे यांचा सहभाग होता, असा दावा पक्षाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.