मुंबई- नांदेडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशानंतर एनडीएचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेसह भाजपावर प्रहार केला आहे. उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी भाजपा नेत्यांवरही निशाणा साधला आहे. नांदेडमध्ये मिळालेल्या यशाबद्दल राणे यांनी अशोक चव्हाणांचं अभिनंदन केलं आहे.

ते म्हणाले, नांदेडमध्ये कोणताही करिष्मा झालेला नाही. नांदेड महापालिकेत आधीपासूनच काँग्रेसची सत्ता होती. नांदेड महापालिकेतील सत्ता राखण्यात काँग्रेसला फक्त यश मिळालं आहे. नांदेडमध्ये कशा पद्धतीनं निवडणुका होतात हे मला चांगलं माहीत आहे. नांदेडमधल्या निवडणुकीत एमआयएमला मॅनेज केलं जातं. त्यामुळेच काँग्रेसच्या जागा निवडून येतात, असा आरोपही राणेंनी केला आहे.

 नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्यासाठी विचारल्याची माहिती नारायण राणेंनी दिली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीएत येण्याबाबत विचारले. मात्र, माझा निर्णय दोन दिवसात त्यांना कळवणार आहे. 
दरम्यान, नारायण राणे स्वतः आपल्या आमदार मुलाला पक्षात घेऊ शकत नाहीत, अशी त्यांची अवस्था झाली आहे,  अशा शब्दांत शरद पवारांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, शरद पवार यांचा आशीर्वाद घेऊनच पक्ष स्थापन केला आहे. त्यांनी अशी टीका करायला नको होती. दुसरीकडे, नारायण राणेंच्या नव्या पक्षाची धोरणं एनडीएसाठी अनुकूल असतील, तर त्यांचं एनडीएत स्वागत करू, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते. 
 काय म्हणाले होते शरद पवार ?
नव्याने राजकीय पक्ष स्थापन केलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता पवारांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली. 'नारायण राणे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांची काळजी घ्यायला हवी होती. आता निष्ठावान कार्यकर्ते सोडून गेले आहे. राणे यांचा पुत्र आमदार आहे. याशिवाय त्यांचे एक निष्ठावान सहकारी आमदार आहेत. मात्र ते त्यांना पक्षात घेऊ शकत नाहीत, अशी त्यांची अवस्था झालीये', असे पवार यावेळी म्हणाले.