'दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 12:46 PM2019-06-27T12:46:32+5:302019-06-27T12:49:15+5:30

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची विधानसभेत माहिती

Ban on milk plastic bags will be implemented in one month says environment minister ramdas kadam | 'दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होणार'

'दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होणार'

Next

मुंबई: दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होईल, अशी  माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत दिली. दुधाची पिशवी घेताना ५० पैसे डिपॉझिट घ्यायचे आणि पिशवी परत दिली की ५० पैसे परत द्यायचे ही योजना सर्व दुध कंपन्यांनी मान्य केली आहे. एका महिन्यात हे सुरू होईल अशी माहिती कदम यांनी विधानसभेत दिली. राज्यात दिवसाला १ कोटी दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्या रस्त्यावर येतात आणि त्यातून ३१ टन प्लॅस्टिक कचरा निर्माण होत असल्याचे कदम यांनी सांगितले.

राज्यात प्लॅस्टीक बंदी लागू झाली, मात्र दुधाच्या प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर अद्याप सुरू असल्याकडे विधानसभेत काही आमदारांनी पर्यावरण मंत्र्यांचे लक्ष वेधले. विधानसभेत आज  प्लॅस्टिक बंदीबाबतची लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. त्यावर कदम यांनी भाष्य केलं. राज्यात १२०० टन प्लॅस्टिक कचरा राज्यात निर्माण होत होता. प्लॅस्टिक बंदीनंतर यातील ६०० टन प्लॅस्टिक कचरा कमी झाला. राज्यात येणारं प्लॅस्टिक हे बाहेरील राज्यातून येतं. यात गुजरातमधून ८० टक्के प्लॅस्टिक येतं. ते बंद करण्यासाठी गुजरात सीमेवर प्लॅस्टिक ट्रकवर आपण स्वतः जाऊन कारवाई केल्याची माहिती कदम यांनी दिली.

राज्यात १ लाख २० हजार २८६ टन प्लॅस्टिक जप्त केलं करण्यात आले असून २४ कंपन्या दिवसाला ५५० टन प्लॅस्टिकवर प्रक्रिया करतात. तर सिमेंट कंपन्यांना ३००० हजार टन प्लॅस्टिक वापरायला दिले असल्याचे कदम यांनी सांगितले. या लक्षवेधीवर बोलताना शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी राज्यात अजूनही प्लॅस्टिकचा सर्रास वापर केला जात असल्याचा दावा केला. तर दुधाच्या पिशव्या ही शहराच्या दृष्टीने एक मोठी समस्या असून सरकार त्याबाबत काय निर्णय घेणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला होता. तर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार परराज्यातून येणारे प्रवासी मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक घेऊन येतात. रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक राज्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
 

Web Title: Ban on milk plastic bags will be implemented in one month says environment minister ramdas kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.