Aruna Dhere criticise action taken on nayantara sehgal by sahitya mahamandal | बळाच्या जोरावर धमक्या देणाऱ्यांपुढे झुकणं चुकीचं; अरुणा ढेरेंचं सूचक विधान
बळाच्या जोरावर धमक्या देणाऱ्यांपुढे झुकणं चुकीचं; अरुणा ढेरेंचं सूचक विधान

यवतमाळ : झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचे धनी होण्याच मार्ग स्वीकारणार का? असा सवाल करीत ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करून संयोजकांकडून गंभीर चूक घडली आहे. संमेलन साहित्यबाह्य शक्तीच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट असताना ती जोखीम समजशाक्तीने उचलली गेलीच पाहिजे, ही काळाची गरज संयोजकांना ओळखता आली नाही, अशा शब्दांत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी संमेलनाच्या आयोजकांना व्यासपीठावरूनच सुनावले. 


साहित्य हा एक उत्सव असतो पण अनेक कारणांनी आपण त्या आनंदोत्सवाचं स्वरुप गढूळ होऊ दिले. आपले दुर्लक्ष, भाबडेपणा आणि मर्यादित समज, आपल्या लहानसहान मोहांना आणि वाडमयीन राजकारणाला सहज बळी पडणं, या सगळ्या आणि इतर कारणांमुळे आपण हा उत्सव भ्रष्ट होऊ दिला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 


यवतमाळ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, नयनतारा सहगल यांचे निंमत्रण रद्द केल्याने केवळ संयोजन समिती नव्हे, केवळ साहित्य संमेलन नव्हे तर सगळ्या मराठी साहित्यप्रेमींच्याच माना खाली जाताहेत याची गंभीर जाणीव असायला हवी होती. शिवाय या धमक्या बळाच्या जोरावर का होईना पण कोणत्याही विधायक गोष्टींचा आग्रह धरणाºया नव्हेत. साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही अशा कोणा समुहाने दिलेल्या धमक्यांमुळे वाकणे ही शोभनीय गोष्ट नव्हे. दूर डेहराडूनवरून प्रवास करीत वयाच्या 93 व्या वर्षी नयनतारा येथे येणार होत्या. खुल्या मंडपात, संमेलनाच्या गर्दीत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा होता. म्हणून हा निर्णय संयोजकांनी घषतला. त्यातली स्वाभाविकता समजून घेतली तरी परिस्थितीची मागणी त्याहून मोठ्या निर्णयाची होती हेही आपण लक्षात घ्यायाला हवे. त्यांचे नियोजित भाषण आता आपल्यासमोर आले आहे. त्यांचे राजकीय विचार काही थोडेफार अपवाद वगळता वाचकांसमोर आले आहेत. संमेलनाला त्यांना निमंत्रित करताना जो हेतू मराठी माणसांच्या मनात होता त्याला त्या राजकीय विचारांचा रंग आता चढला आहे. त्यांच्या तशा विचारांशी सहमत असणारे आणि नसणारे असे दोन्ही प्रकारचे वर्ग मराठी वाचकांमध्ये अद्याप तयार व्हायचे असतानाच त्यावरून एक लढाई सुरू झाली आहे. 


ढेरे म्हणाल्या, नयनतारा यांनी यावं आणि अगदी मोकळेपणाने, निर्भयपणे आपले विचार या व्यासपीठावरून मांडावेत. त्यांचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राखले जावे. त्यांची मते आपण जाणून घ्यावीत, ती आपल्याजवळच्या विवेकाने पारखावीत. स्वत:च्या मतांच्या मांडणीचे संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना असलंच पाहिजे. त्या मतांशी संपूर्ण सहमत होण्याचं, असहमत होण्याचं किंवा वेगवेगळ्या बाजूंनी त्यांच्या मतांचा विचार करत त्यांची मौलिकता तपासायला हवी होती. 


साहित्यातील शक्तीला आपण नीट ओळखलं नाही, अशी खंत व्यक्त करताना ढेरे म्हणाल्या, आपल्या हातून तिची अवहेलना झाली, तर आता त्या गोष्टीची भरपाई करण्याची वेळ आली आहे. कोणीही यावं आणि वाडमयबाह्य कारणांसाठी किंवा वाडमयीन राजकारणासाठी हे संमेलन वेठीला धरावे असे आता आपण होऊ देता कामा नये. दर वर्षी कोणत्या ना कोणत्या अत्यंत गौण, क्षुद्र, कित्येकदा लाजिरवाण्या कारणांनी संमेलनं ही वादाचा विषय झाली. भल्या वाचकांनी, निर्मळ साहित्यप्रेमींनी आणि वृत्तीगांभिर्याने लेखन करणाऱ्यांनी संमेलनाच्या या स्वरुपाबद्दल चिंता व्यक्त केली. काहींनी या अमंगळ वातावरणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि संमेलनाचं स्वरुप नकोशा वाटणाऱ् याअनेक गोष्टींनी विकृत राहिलं. आपल्यासारखे अनेक जण खंतावत राहिले, पण संमेलनाला येत राहिले. कारण आपल्यापैकी अनेकांसाठी ही पंढरीची वारी आहे. पण ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ हे विठूभक्तांच ब्रीद आपण विसरून गेलो. म्हणून संमेलनाला वेठीस धरणाऱ्या, भ्रष्ट करणाऱ्या आणि साहित्याचं मूल्य शुन्यावर करणाऱ्या अनेक बाबींचे आपण बळी ठरलो. आपल्याला साहित्यावरच राजकारण नको आणि साहित्यजगातलं राजकारणही नको आहे. या दोन्ही गोष्ठी झुगारून देण्याची वेळ आली आहे. काय चांगले आणि काय वाईट, काय हितकारकर आणि काय हानिकारक याचा विवेक करण्याची वेळ आपल्या व्यक्तीजीवनात आणि समूहजीवनातही अनेकदा येते. इतिहासात अशा अनेक वेळा आल्याआहे की अगदी आणीबाणीच्या प्रसंगी समाजाने आपला विवेक जागा ठेवला आहे. आपला विवेक जागा ठेवण्याची ही वेळ आहे.  हा उत्सव पुन्हा निर्मळ करण्याची संधी आहे. सुरूवात आहे पण बदल एका रात्रीत होत नाहीत. सगळे अपेक्षित सकारात्मक बदल तर दीर्घकाळ होत राहतात. ते चिकाटीने करायला लागतील, असेही ढेरे म्हणाल्या.


आपले वडील रा. चिं. ढेरे यांचा संदर्भ देऊन ढेरे म्हणाल्या, स्वत:च्या संशोधकीय लेखनासाठी संघर्ष करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी संघर्ष केलाच. सार्वजनिक क्षेत्रात उतरून एकट्यानं केला. अंध भक्तांशी केली. स्थितिप्रिय ºहस्वदृष्टीच्या परंपरानिष्ठांशी केला आणि गरज पडली तेव्हा शासनासमोरही ताठ उभं राहून केला. वैचारिक तर केलाच पण न्यायालयीनही केला.कुणाचीही हिंसा केव्हाही निंद्यच आहे आणि झुंडीचं राजकारण केव्हाही त्याज्यच आहे. कुणा एका विशिष्ट संस्थेच्या किंवा सत्तेच्या विरुद्ध पवित्रे घेताना आपण स्वत:कडे पाहणं विसरतो आहो. एक मोठा, सहिष्णु वृत्ती जोपासणारा आणि ज्ञानोपासना हीच जगात कल्याणमार्गावर चालण्यासाठीची सर्वोत्तम वाट आहे, असा दृढ-दृढतम विश्वास बाळगणारा सुधारक विचारवंतांचा आणि ज्ञानोपासकांचा वर्ग आपल्यामागे आहे. जरा पहा गणेश विसपुते या आमच्या कविमित्रानं म्हटल्याप्रमाणे ‘स्मृती नष्ट होती; पण आवाज कधीही नष्ट होत नाहीत, उलट ज्यादा घनतेनं ऐकू येतात.’ भूतकाळातल्या विचारवंतांचे आवाज, ज्ञानवंतांचे आवाज आज आपल्याला ज्यादा घनतेने ऐकू येऊ शकतील, ते त्यामुळे.


Web Title: Aruna Dhere criticise action taken on nayantara sehgal by sahitya mahamandal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.