अहमदनगर - राजकारणाला नकार देणा-या अण्णा हजारे यांनी भावी पत्रकारांच्या बालचमूने घटकाभरासाठी का होईना पंतप्रधान होणे भाग पाडले. ‘मी पंतप्रधान होणार नाही. फकिराला कोण पंतप्रधान करणार? पण झालोच तर देश भ्रष्टाचार आणि दारुमुक्त करेल’,असे उत्तर अण्णांनी दिले! पत्रकारांच्या भूमिकेत शिरलेल्या बालचमूने अण्णांवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांची शालेय जीवनापासून उलटतपासणी घेतली. मुलांचे दप्तराचे ओझे हटविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा शब्दही अण्णांकडून वदवून घेतला.
या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांनी थेट राळेगणसिद्धी गाठत अण्णांची मुलाखत घेतली. लहान मुलांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची अण्णांची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे एरवी माध्यमांचा सराव असलेले अण्णाही जरा सावध होऊनच या पत्रपरिषदेला सामोरे गेले.
अण्णा तुम्ही शाळेत खोड्या करत होतात का? तुम्ही नेमके कोणाला घाबरता? उपोषण करताना तुम्हाला भूक कशी लागत नाही? या वयातही तुम्ही एवढे काम करता, तुमच्या या सदृढ शरीराचे रहस्य काय? मोठ्यांसाठी तुम्ही खूप कामे केली, आम्हा लहानग्यांसाठी काय करणार? अशा एकाहून एक प्रश्नांचा भडिमार अण्णांवर झाला. उत्तरे देताना अण्णाही नकळत लहान होऊन गेले. शेवटी बालटीमला भ्रष्टाचारमुक्तीची व व्यसनमुक्तीची शपथ दिली.
‘तुम्ही पंतप्रधान होणार की नाही? झालेच तर काय करणार? या प्रश्नावर अण्णा खळखळून हसले. ‘मी पंतप्रधान झालेलो या पुढाºयांना परवडणार नाही’, असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले. आपल्या उपोषणाचे रहस्यही अण्णांनी उलगडले, उपोषणाला सराव लागतो. तुमच्यासारखा वडापाव आणि पिझ्झा बर्गर खाल्ला तर उपोषण जमणार नाही, असे मिश्कील उत्तर अण्णांनी दिताच बालचमुंनी त्यास दाद दिली.
मी फक्त आईला घाबरतो
मला आयुष्यात कोणाचीही भीती वाटली नाही. अगदी सीमेवर गोळीची सुद्धा. पण, आईला जाम घाबरायचो. तिची सात्विक भीती होती. चुकलं तर आई काय म्हणेल याची चिंता असायची -अण्णा हजारे
फुटाण्यावर लॉटरी
मी शाळेत एक लॉटरी चालवायचो. पेन्सिलीने नंबर टाकायचो आणि ज्याचा जास्त नंबर त्याला तेवढे फुटाणे द्यायचो’, असे आपले लॉटरी खेळण्याचे रहस्य अण्णांनी उलगडले.
नापासाचे धोरण चुकीचे
राळेगणमधील नापासांच्या शाळेची कहाणी अण्णांनी मुलांना सांगितली. आठवीपर्यंत नापास न करण्याचे सरकारचे धोरण चुकीचे असून त्यामुळे शिक्षक घराकडे व घड्याळाकडे पाहून काम करतात असे ते म्हणाले.