अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरण : आरोपींना 12 दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत on Thu, November 09, 2017 2:57pm

प्रकरणाचा मुख्य सुत्रधार पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह पाच पोलीस व एक झिरो पोलीस या सर्वांना 12 दिवसांची पोलीस कोठडी

सांगली: लूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे या आरोपीचा सांगली पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह पाच पोलीस व एक झिरो पोलीस या सर्वांना आज सकाळी सांगली जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय युवराज कामटेंसह 5 जणांना बडतर्फ करणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे. पोलीस कोठडीतून पलायन केल्याचा दावा केलेल्या अनिकेत अशोक कोथळे वय 26 या युवकाचा कोठडीतच खून करून त्याचा मृतदेह आंबोली घाटात  पोलीसांनीच जाळला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा खून पटविण्यासाठी कामटेंच्या पथकाने आरोपी पळून गेल्याचा बनाव रचण्यात आला, हेही आता स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कामटेंसह पाच पोलिस व एक झिरो पोलिस अशा सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना अटकही करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबाबत माहिती दिली.  सांगली पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या दरोड्यातील संशयित  आरोपी अनिकेत कोथळे याचा मृतदेह आंबोलीतील महादेवगड पाॅईट येथे रस्त्यापासून 42 मीटर अंतरावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता .तो मृतदेह सांगली पोलिसांचे विशेष पथक सीआयडी चे अधिकारी व सावंतवाडी न्यायालयाच्या उपस्थित घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बाहेर काढला. नांगरे-पाटील यांची पत्रकार परिषद - पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, सूरज मुल्ला, राहुल शिंगटे व झिरो पोलिस झाकीर अशी पथकातील अटक केलेल्या सहाजणांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध खून, पुरावा नष्ट करणे, शासकीय पदाचा गैरवापर करणे, आरोपींना मारण्यासाठी थर्डडिग्रीचा वापर करणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे प्रकरण सीआयडीकडे देण्यात येणार असल्याची माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. नांगरे-पाटील म्हणाले, कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड या अभियंत्यास चाकूच्या धाकाने लुबाडल्याप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल सुनील भंडारे (वय २३, रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) या दोघांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कामटे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता.  सोमवारी रात्री कामटे कामटेंच्या पथकाने पोलिस कोठडीतून कोथळे व भंडारेला चौकशीसाठी बाहेर काढले. त्यांना गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखेत आणले. कोथळेला पंख्याला हुकाला उलटे टांगले. थर्डडिग्रीचा वापर करुन त्याला बेदम मारहाण केली. त्याचे डोके पाण्यात बुडवून ठेवले. प्रचंड मारहाण आणि डोके पाण्यात बुडविल्याने कोथळेचा डीबी रुममध्येच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सुनील भंडारे यांना पाहिला होता. दोनवेळा मृतदेह जाळला नांगरे-पाटील म्हणाले, मंगळवारी सकाळी दहा ते अकरा या वेळेत कामटेंच्या पथकाने कोथळेचा मृतदेह जाळला. पण तो व्यवस्थित जाळला नाही म्हणून पुन्हा पेट्रोल आणून हा मृतदेह जाळला. त्यानंतर कामटे यांचे पथक सायंकाळी सांगलीत दाखल झाले. कामटेंनी पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याशी संपर्क साधून पळालेल्या दोन आरोपीपैकी अमोल भंडारे यास मी स्वत: निपाणी (जि. बेळगाव) येथे पकडल्याचे सांगून स्वत:च्या कृत्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला.  सांगलीत जाळण्याचा बेत  कामटे यांच्या पथकाने कोथळेचा मृतदेह सांगलीत जाळण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार कामटेने आणखी दोन लोकांना मदतीसाठी बोलावून घेतले. अमोल भंडारे हा या घटनेचा साक्षीदार असल्याने त्याला कामटेने सोबतच घेतले. भंडारेला मदतीसाठी आलेल्या दोन लोकांच्या ताब्यात दिले. त्यांना सांगलीत कृष्णा नदीच्या घाटावर बसण्यास सांगितले. रात्री बारापर्यंत भंडारे दोन लोकांसोबत घाटावर बसला होता, अशी माहिती नांगरे-पाटील यांना मिळाली आहे. त्याआधारे ते पुढील तपासाबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत. संतोष गायकवाड हे अभियंते मुंबईत नोकरीस आहेत. रविवारी पहाटे ते नांदणी (ता. शिरोळ) येथे सासरवाडीला जाण्यासाठी एसटीने सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर आले होते. त्यावेळी संशयितांनी त्यांना चल भावा, तूला नांदणीला सोडतो, असे म्हणून दुचाकीवर बसविले. त्यांना कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ नेऊन चाकूचा धाक दाखवून दोन हजाराची रोकड व मोबाईल काढून घेतला होता. शहर पोलिसांनी या घटनेचा २४ तासात छडा लाऊन अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. सोमवारी दुपारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. रात्री उशिरा या दोघांना चौकशीसाठी कोठडीतून बाहेर काढण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना पोलिस ठाण्याच्या पायरीवर बसविले होते. पोलिस त्यांच्या कामात व्यस्त होते, याची संधी साधून हे दोघेही पोलिसांच्या हातावत तुरी देऊन पळून गेले, असा बनाव या पोलिसांनी रचला. रात्री साडेबारा वाजता पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे आरोपींची कोठडी तपासणीसाठी पोलिस ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी हे दोन्ही आरोपी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विचारणा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर ड्युटीवरील पोलिसांना घाम फुटला. संशयितांच्या शोधासाठी शहर परिसरात पहाटे चार वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात आली होती.

संबंधित

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत काही ठिकाणी डीजे सुरु , ढोलपथकांची अरेरावी 
गोव्यात कार फिल्मिंग व फॅन्सी क्रमांक पाटीविरुद्ध कारवाई मोहीम
आंध्र प्रदेशमध्ये आजी-माजी आमदारांची गोळ्या झाडून हत्या, राज्यात खळबळ
आमदार, खासदारांची जीभ छाटू, पोलीस अधिकाऱ्याची धमकी
पोलीस परवानगीचा घोळ :चुका पोलिसांच्या; मनस्ताप मात्र नागरिकांना

महाराष्ट्र कडून आणखी

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 24 सप्टेंबर
राज्याचेही स्वतंत्र शैक्षणिक चॅनेल हवे, शिक्षक परिषदेची विद्या प्राधिकरणकडे मागणी
इस्पितळेच उठली रुग्णांच्या जीवावर : कसा होईल डेंग्यू बरा ?
शरद पवारांबाबत यापुढे काहीही बोलणार नाही - प्रकाश आंबेडकर
परदेशी गुंतवणुकीच्या विरोधात व्यापा-यांचा शुक्रवारी देशव्यापी बंद  

आणखी वाचा